लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अंबुजा सिमेंट कंपनी, उपरवाही ( गडचांदूर ) येथून रेल्वे मालगाडी मध्यप्रदेश बैतुल येथे जात होती. मालगाडीने बल्लारशाह रेल्वे स्टेशन सोडले. दरम्यान, विसापूर रेल्वे स्थानकावर मालगाडी येताच दुपारी १२.२० वाजता इंजिन क्रमांक ४१३४२ मध्ये बिघाड आला. यामुळे मद्रास ते दिल्ली अपलाईन मार्गांवरील रेल्वे वाहतूक दीड तास विस्कळीत झाली. प्रवाशी गाडयांना बल्लारशाह रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले. तब्बल दीड तासांनंतर जोड इंजिन जोडून मालगाडी बैतुलकडे रवाना झाली. ही घटना बुधवारी १२.२० वा. घडली.चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरजवळील उपरवाही अंबुजा सिमेंट कपंनी येथून ५० ते ५५ वॅगनमध्ये सिमेंट भरून बल्लारशाहमार्गे बैतुलकडे मालगाडी निघाली. ही मालगाडी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर (गोंडवाना) रेल्वे स्थानकावर येताच इंजिन क्रमांक ४१३४२ मध्ये अचानक बिघाड निर्माण झाला. मालगाडीच्या दोन्ही पायलटने प्रयत्न करूनदेखील मालगाडी पुढे जात नव्हती. दुपारी १२.२० वाजतापासून १.४५ वाजतापर्यंत विसापूर रेल्वे स्थानकावर मालगाडी थांबून होती. पायलटने याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. या अचानक निर्माण झालेल्या घटनेमुळे मद्रास ते दिल्ली अपमार्गांवरील रेल्वे वाहतूक दीड तास प्रभावित झाली. अनेक प्रवाशी गाड्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या.रेल्वे अधिकाऱ्यांनी सपंर्क करून दुसरे रेल्वे इंजिन मागविले. दुपारी १.४५ वाजता इंजिन क्रमांक २८४७२ व २८२४१ हे जोड इंजिन बल्लारशाह येथून आणून मालगाडीला जोडण्यात आले. त्यानंतर विसापूर (गोंडवाना )येथून मध्यप्रदेशातील बैतुलकडे रवाना झाली.