आठ तासांच्या ‘त्या’ थराराचा शेवट मात्र दुर्दैवी...
By Admin | Updated: June 19, 2015 01:46 IST2015-06-19T01:46:29+5:302015-06-19T01:46:29+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा या गावातील १५ जूनची पहाट भयावह ठरली. चक्क गावात बिबट्याने ठाण मांडले आणि अख्ख्या गावाचीच गाळण उडाली !

आठ तासांच्या ‘त्या’ थराराचा शेवट मात्र दुर्दैवी...
गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर
ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा या गावातील १५ जूनची पहाट भयावह ठरली. चक्क गावात बिबट्याने ठाण मांडले आणि अख्ख्या गावाचीच गाळण उडाली !
ब्रह्मपुरीपासून २० किलोमीटर अंतरावरचे हे गाव. गाव तसे जंगलालगतचे. पण गावात कधीही वन्यजीव आतापर्यंत आलेला नव्हता. सर्वांची कामे कशी बिनधास्त चालायची. अधूनमधून कुठल्यातरी गावात बिबट किंवा वाघ शिरल्याच्या बातम्या कानावर यायच्या. सायंकाळच्या चहानंतर देवळाच्या पारावर चंची सोडता सोडता या विषयावर अघळपघळ चर्चा रंगायच्या, बस्स... एवढेच...
पण, १५ जूनची पहाट उगवली ती चक्क गावाची साखरझोप खराब करूनच ! गावातील राजेंद्र भोयर हा शेतकरी नेहमीप्रमाणे झुंजूमुंजू होताच जागा झाला. पहाटेचे पाच-सव्वापाच वाजले असावेत. बैलांना कुटार खाऊ घालण्यासाठी म्हणून गोठयात गेला आणि अचानक कानावर वेगळीच गुरगुरू ऐकायला आली. राजेंद्र समजायचे ते समजला, पण काही कळायच्या आतच अंधारात लपून बसलेल्या बिबट्याने त्याच्या अंगावर उडी घेतली आणि जखमी केले. या आरडाओरडीमुळे गावकरी जागे झाले. जमाव वाढला, तसा बिबटाने गोठ्यातून पळ काढला.
या गावाची रचना र्इंग्रजीमधील यू अक्षरासारखी आहे. भोवती घरे आणि तोंडावर बोडी. पावसाळ्याची सुरूवात असल्याने पाणी कमी असले तरी बेशरामांच्या झाडांनी बोडीचा परिसर व्यापला आहे. बिबटाने गोठ्यातून धूम ठोकली ती थेट या गावाबोडीत ! या बोडीतील बेशरमांच्या झुडपात तो दडून बसला. भोवती वस्ती, लागूनच असलेली घरे, आणि तिथेच बोडी. जमाव वाढला. बोडीच्या दिशेने दगडफेक सुरु झाली. पण बिबट लपलेलाच. अशातच वनविभागाला सूचना देण्यात आली. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, उपविभागीय अधिकारी सीमा अहीरे, रेस्क्यू दल, इको-प्रोचे सदस्य या गावात पोहचले. पण तोपर्यंत गावकरी चांगलेच बिथरलेले होते. गावात बिबट शिरल्याचे ऐकून परिसरातील गावकऱ्यांनीही हळदाकडे धाव घेतल्याने हजारोंवर जमाव जमला होता.
पोहचलेल्या रेस्क्यू टिमपुढे आव्हान बिबटाला पकडण्याचे असले तरी खरे आव्हान होते ते म्हणजे, गावकऱ्यांना या परिसरातून बाहेर काढण्याचे. विनंती करून झाली, चर्चा करून पाहिली, समजावून सांगितले, पण गावकरी हटेतनाच.
अखेर भोवताल गावकरी आणि बोडीभोवती जमलेले रेस्क्यू टिमचे सदस्य अशा वातावरणात अभियान सुरू झाले. बोडीत लपलेल्या बिबटाला बाहेर काढण्यासाठी बोडीतील बेशरमांची झाडे तोडण्याची गरज होती. अखेर लांब बांबूला विळा बांधून आणि दुसऱ्या हाताने बिबटापासूनच्या बचावासाठी डिफेन्सर पकडून बेशरमांच्या झाडांची कटाई सुरू झाली. मात्र बिबट कुठूनही हल्ला करण्याची शक्यता होती. यामुळे कॅम्पर वाहन आडवे लावून त्यावर एक शुटर बसविण्यात आला. आणि पुन्हा बेशरमांची कटाई सुरु झाली. याचवेळी अचानकपणे दबा धरून बसलेला बिबट बाहेर आला आणि चक्क शुटरवरच हल्ला केला. त्यात त्याचा डावा हात जखमी झाला. याच धावपळीत एका गार्डचा पाय चिखलात घसरला. बिबटाने शुटरला सोडून आपला मोर्चा गार्डाकडे वळविला. त्याच्या मानेला पकडण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने तो बचावला.
याच दरम्यान गावकऱ्यांचा गिल्ला वाढत होता. गर्दीही वाढायला लागली. अखेर दंगा नियंत्रण पथक बोलावण्यात आले. यानंतर पुन्हा बिबटाला पकडण्याचे अभियान सुरु झाले. दोन बाजू मोकळ्या करून तिसरी बाजू त्याला पळण्यासाठी मोकळी करावी, असे ठरले. बिबटाला हुसकावण्यासाठी सुतळी बॉम्ब फोडण्यात आले. पण बिबट तसूभरही हलला नाही.
अशातच सायंकाळचे ५.३० वाजायला आले. बिबट अद्यापही हाताबाहेरच होता. सायंकाळ होत आली तसा गावकऱ्यांचा दबाव वाढायला लागला. अखेर वाहनाच्या आडोश्याने जाळी बांधण्याचा निर्णय झाला. वाहन पुढे आणि जाळी बांधणारे मागे, असे करत काम सुरू असतानाच अचानकपणे बिबटाने झेप घेतली. याच क्षणी रेस्क्यू टिममधील सदस्यांनी त्याला जाळीत दाबण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चक्क बिबटाच्या अंंगावर बसून त्याला जाळीत दाबून धरले. संधी साधून गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले. बिथरलेल्या बिबटाने जाळीतून नख बाहेर काढून एकाला जखमी केले. त्यानंतर त्याचे डोकेही बाहेर निघाले. परिस्थिती हातघाईची झाली होती. अशातच त्याने एकाच्या हाताला आणि एकाच्या पायाला चावा घेतला. यामुळे सदस्यांचे मनोर्धैर्य खचले. याचा फायदा घेवून बिबटाने स्वत:ची सुटका केली आणि पुन्हा बेशरमांच्या झुडपात धाव घेवून दडी मारली.
या वेळी बिबटाला गुंगीचे र्इंजेक्शन देण्यात आले होते. र्इंजेक्शननंतर साधारणत: १० मिनिटांनी प्राणी बेशुद्ध होतो. हे लक्षात घेऊन तो बेशद्ध होऊन बोडीतील पाण्यात पडून नये व त्याच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून त्याचा पुन्हा शोध सुरू झाला. या दरम्यान झाडीमध्ये त्याचे मागचे पाय फसलेले लक्षात आले. अर्धवट शुद्धीत असलेला बिबट पाय सोडविण्याचा प्रयत्न करीत होता. संधी साधून त्याला पकडण्यात आले. बेशुद्धावस्थेतच त्याला वाहनात टाकून सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान एकारा मार्गे ब्रह्मपुरीकडे नेण्यात आले. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. मात्र एकारा रेस्ट हाऊसजवळ बिबटाचा मृत्यू झाला.
बेशुद्ध झाल्याने तो पाण्यात पडला. नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला, हे स्पष्टच आहे. त्याला किती वेळा गुंगीचे इंजेक्शन दिले होते, हा प्रश्न पुन्हा वेगळाच आहे. मात्र पाणवठ्याजवळ प्राण्यांना गुंगीचे इंजेक्शन देऊ नये, असा नियम असतानाही तसे करण्यात आले. यामागे गावकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा होता, हा या घटनाक्रमातील नवा पैलू असू शकतो. मात्र जीवावर उदार होऊन इको-प्रोच्या सदस्यांनी आणि रेस्क्यू दलातील सदस्यांनी जी मेहनत घेतली, त्याला तोड नाही. \