राखीव जमिनीवर श्रीमंतांचे अतिक्रमण

By Admin | Updated: July 27, 2014 23:40 IST2014-07-27T23:40:11+5:302014-07-27T23:40:11+5:30

स्मशानभूमी, गुरेचराईसाठी राखीव असलेल्या जागेवरच गावातील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. याच जागेवर गेल्या काही वर्षापासून पीक घेऊन उत्पन्न लाटण्याचा प्रकार सुरु आहे.

The encroachment of the rich on the reserved land | राखीव जमिनीवर श्रीमंतांचे अतिक्रमण

राखीव जमिनीवर श्रीमंतांचे अतिक्रमण

चंद्रपूर : स्मशानभूमी, गुरेचराईसाठी राखीव असलेल्या जागेवरच गावातील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. याच जागेवर गेल्या काही वर्षापासून पीक घेऊन उत्पन्न लाटण्याचा प्रकार सुरु आहे. अतिक्रमीत जागा मोकळी करण्यात न आल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वीच एसडीओंनी ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय घेऊन ही जागा खाली करण्याचे निर्देश अतिक्रमणधारकांना दिले होते. मात्र, एसडीओंच्या आदेशावर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगनादेश दिला आहे. त्यामुळे राखीव जागेवरील अतिक्रमण तातडीने न काढल्यास धनाढ्यांच्या शेतातच जनावरे शिरवून त्यांच्या पिकांचे नुकसान करण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.
धनाढ्य अतिक्रमणधारकांचा मनमानी कारभार सिंदोळा येथील ग्रामस्थांनी शनिवारी (ता. २६) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उजेडात आणला. सावली तालुक्यातील सिंदोडा येथे एक हजार लोकसंख्येचे गाव. याच गावात जवळपास साडेसतरा एकर जागा स्मशानभूमी आणि गुरेचराईसाठी राखीव आहे. याच जागेवर प्रारंभी ग्रामस्थ आपले जनावरे चराईसाठी नेत होते. येथे स्मशानभूमीचे कामही प्रस्तावित होते. मात्र, याच राखीव जागेवर गावातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपला कब्जा केला. एवढ्यावरच ते थांबले नाही. त्यांनी या जागेवर शेती करणेही सुरु केले. शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आता धनाढ्या बारमाही पिक याच अतिक्रमीत जागेवर घेत आहेत. राखीव जागेवरच अतिक्रमण करण्यात आल्याने गावकऱ्यांना गुरेचराईसोबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार- पाच वर्षापासून हे अतिक्रमण हटविण्यात यावे,अशी मागणी करीत ग्रामस्थ लढा देत आहेत. काही दिवसांपूर्वीच मूल येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिला. अतिक्रमणधारकांनी तातडीने राखीव जागा मोकळी करावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले. या आदेशाने अतिक्रमण निघेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगनादेश काढला. स्थगनादेशाने अतिक्रमणधारकांचे मनोधैर्य वाढले आहे. याप्रकरणाची कोणतीही चौकशी न करता स्थगनादेश मिळाल्याने गावकऱ्यांतही संतापाचे वातावरण पसरले आहे. येत्या २८ जुलैपर्यंत अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमणधारकांच्या शेतातच जनावरे सोडण्याच्या मानसिकतेत असल्याचे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा उंदिरवाडे, सुरेश मॅकलवार यांनी सांगितले. गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमण हटविण्याबाबत नागरिकांचे प्रयत्न सातत्याने सुरु आहे. मात्र, कोणाचेही त्यांना सहकार्य मिळत नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The encroachment of the rich on the reserved land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.