पांदण रस्त्यावर अतिक्रमण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:41+5:302021-02-05T07:40:41+5:30
अतिक्रमण वाढले राजुरा : बहुतांश गावाची शिव आणि ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते ...

पांदण रस्त्यावर अतिक्रमण वाढले
अतिक्रमण वाढले
राजुरा : बहुतांश गावाची शिव आणि ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून त्याठिकाणी पक्के रस्ते तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोंडवाड्यातील
जनावरे असुरक्षित
नागभीड : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र सध्या या कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा आणि जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे अत्यावश्यक आहे. मात्र ती करण्यात येत नसल्याचे ते जनावरे असुरक्षित आहे.
कुत्र्यांच्या हैदोसाने
नागरिक त्रस्त
सिंदेवाही : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
वरोरा डासांचा
प्रादुर्भाव वाढला
वरोरा : शहरातील काही वाॅर्डात नाल्यांची साफसफाई न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगरपालिकेकडून काही वाॅर्डात फवारणी करण्यात आली होती. त्यानंतर ही कामे बंद आहेत. त्यामुळे फवारणी पुन्हा सुरू करण्याची मागणी युवकांनी केली आहे.
देवघाट मार्गावर
अपघाताची शक्यता
कोरपना : कोरपना ते गडचांदूर महामार्गावरील खिर्डी ते देवघाट दरम्यान रस्त्यावरील वळणावर झुडपे वाढले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. मात्र रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपामुळे वळणावर पुढील येणारे वाहन दिसत नाही.
गंजवार्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर :येथील गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. मात्र दुर्गंधीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.
अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
जिवती: येथील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अडचण जात असून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करून दिलासा देण्याची गरज आहे.
बेरोजगार युवकांना
कर्ज देण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यात उद्योगांचा अभाव आहे. बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. उद्योग नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहेत. बँकांकडून कर्ज मिळत नाही. परिणामी, युवकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगारासाठी कर्ज देण्याची मागणी केली जात आहे.
दुरसंचार सेवा
सुरळीत करा
घुग्घुस : भारतीय दूरसंचार विभागाच्यावतीने ग्राहकांना देण्यात येणाºया अत्यंत ढिसाळ सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. बीएसएनएल मोबाईल व इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांना अडचण जात आहे.
प्लास्टिकचा वापर
निर्बंध नाही
वरोरा : शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढतच आहे. येथील अनेक वॉर्डातील दुकानांमध्ये व अन्य बाजाराच्या ठिकाणी गरज नसतानाही पिशव्या देण्यात येतात. या पिशव्या कुठेही टाकून दिल्या जात आहेत. यातून नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.
स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
पोंभुर्णा : गावागावात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र, काही ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आदिलाबाद महामार्गावर धोकादायक खड्डे
कोरपना : चंद्रपूर-कोरपना-आदिलाबाद आंतरराज्यीय व वणी मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील सोनुर्ली ते देवघाट, कोठोडा व वणी मार्गावरील कोरपना ते कोडशी (खुर्द) दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
ट्राफिक सिग्नल
बसविण्याची मागणी
वरोरा : येथील आनंदवन चौक व डॉ. एपीजे अब्दुल कलाम चौकात रहदारी रस्त्यावर महाविद्यालय, कॉन्व्हेंट अशा शैक्षणिक संस्था आहे. महारोगी सेवा समितीद्वारा निर्मित आनंदवन, नागरी वसाहत, बाजारपेठ व आठवडी बाजारही त्या रस्त्यावरच भरतो. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी आनंदवन आणि एपीजे अब्दुल कलाम चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.