सहा टप्प्यांत होणार ९४६ सहकारी संस्थांची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:50+5:302021-02-06T04:50:50+5:30
अचानक कोरोना संकट उद्भवल्याने मुदत संपलेल्या ९४६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीला मार्च २०२० मध्ये तीन महिन्यांची मुदत देण्यात आली हाेती. ...

सहा टप्प्यांत होणार ९४६ सहकारी संस्थांची निवडणूक
अचानक कोरोना संकट उद्भवल्याने मुदत संपलेल्या ९४६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीला मार्च २०२० मध्ये तीन महिन्यांची मुदत देण्यात आली हाेती. कोरोनाचा कहर सुरूच असल्याने यापूर्वी या निवडणुकांना चौथ्यांदा मुूदतवाढ मिळाली होती. जिल्ह्यात ब वर्गातील २८४, क वर्गातील १३५ आणि ड वर्गातील २०० व अन्य अशा एकूण ९४६ सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून सहकार विभागालाच कामकाज पाहावे लागत आहे. काेराेनाचा वाढता उद्रेक लक्षात येताच राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्यासोबतच जिल्ह्यातीलही स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोना रुग्णांची संख्या घसरली. त्यामुळे राज्य सरकारने स्थगिती उठवून निवडणुका घेण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे. मात्र, या निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यात सहा टप्प्यांत निवडणूक घेण्याचा आदेश जारी केला आहे.
असे आहेत निवडणुकीचे सहा टप्पे
कोविड १९ मुळे निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच थांबविलेल्या ५७ सहकारी संस्थांची निवडणूक पहिल्या टप्प्यात, ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदत संपलेल्या ३४७ सहकारी संस्था दुसऱ्या टप्यात, ३१ मार्च २०२० रोजी मुदत संपलेल्या २९२ संस्था तिसऱ्या, ३० जून २०२० रोजी मुदत संपणाऱ्या १३९ चौथ्या टप्प्यात, ३० सप्टेंबर २०२० च्या ५६ संस्था पाचव्या टप्प्यात तसेच ३१ डिसेंबर २०२० च्या ५३ संस्थांची निवडणूक सहाव्या टप्प्यात होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
कोट
मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याबाबतच्या सूचना मिळाल्या. मतदार यादी अपडेट करण्याचे काम सुरू झाले. राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार जिल्ह्यातील ९४६ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
- ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूर