लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी जिल्ह्याभरातून तीन हजार ८९९ अर्ज दाखल झाले होते. छानणीमध्ये जवळपास ५८ अर्ज दुबार आले. त्यापैकी ८ अर्ज बाद करण्यात आले असून उर्वरित अर्जाची तपासणी सुरू आहे. शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सन २०२२-२०२३ या सत्रासाठी जिल्ह्यातील १९१ शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये १५०६ जागा राखीव होत्या. त्या जागांसाठी तीन हजार ८९९ जणांनी अर्ज केले होते. यामध्ये काहींनी दुबार अर्ज केले. जवळपास ५८ अर्ज दुबार आल्याचे संशय आहे. त्याची चौकशी सुरू असून आठ अर्ज बाद करण्यात आले असून तपासणीअंती पुन्हा काही अर्ज बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पहिला अर्ज बाद करायचा की दुसरा ?आरटीईसाठी मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातून तीन हजार ८९९ अर्ज आले आहेत. त्या अर्जाची छानणी सुरू आहे. यामध्ये जिल्ह्याभरात ५८ अर्ज दुबार आल्याची माहिती आहे. साधारणत: पहिला अर्ज चुकला असेल म्हणून दुसरा अर्ज भरला असा निष्कर्ष लावला जातो. परंतु, शिक्षण विभागाने पालकांशी संपर्क साधून विचारणा केली असता काही एनजीओने मदत करण्याच्या अनुषंगाने अर्ज भरल्याची बाब समोर आली. त्यामुळे आता पहिला की दुसरा अर्ज बाद करायचा, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.
- आरटीईच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातून साधारणत: तीन हजार ८९९ जणांनी अर्ज केले आहेत. त्या अर्जाची छानणी सुरू आहे.
- लवकरच याची सोडत काढण्यात येणार आहे. परंतु, अद्यापही तारीख प्रसिद्ध झाली नसल्याने सर्व पालकांचे सोडतीकडे लक्ष लागले आहे.
ज्याचे अर्ज दुबार आले आहेत. अशांचे अर्ज बाद करण्यात येत आहे. जर जुडवा बालकांचे अर्ज बाद करण्यात येत असतील तर लगेच समन्वयकांशी संपर्क साधून माहिती द्यावी. -मो. शाहिद शरीफ, अध्यक्ष आरटीई ॲक्शन कमिटी, नागपूर