‘आवडेल ते झाड’ अभियानाला ग्रहण

By Admin | Updated: August 17, 2014 23:02 IST2014-08-17T23:02:29+5:302014-08-17T23:02:29+5:30

चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या आवडेल ते झाड अभियानाला मनपाच्याच उदासीनतेमुळे अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. मनपाने या अभियानाला ‘आवडेल ते झाड’ असे नाव दिले

Eclipse of 'Liked to Tree' campaign | ‘आवडेल ते झाड’ अभियानाला ग्रहण

‘आवडेल ते झाड’ अभियानाला ग्रहण

केवळ १ हजार ४०८ झाडांची विक्री : नागरिकांच्या आवडीची झाडेच नाही
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या आवडेल ते झाड अभियानाला मनपाच्याच उदासीनतेमुळे अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. मनपाने या अभियानाला ‘आवडेल ते झाड’ असे नाव दिले असले तरी नागरिकांच्या आवडीची झाडे पुरविण्यात मनपा अपयशी ठरत आहे. त्यामुळे प्रदूषित चंद्रपूरला दिलासा देऊ शकणाऱ्या या योजनेला सध्या ग्रहण लागले आहे. मनपाने उपलब्ध केलेल्या १८ हजार ५९५ रोपांपैकी केवळ १ हजार ४०८ रोपांची विक्री होऊ शकली.
चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. कितीही उपाययोजना केल्या तरी प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे या प्रदूषणाची टक्केवारी कमी करण्यासाठी मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला. ‘आवडेल ते झाडे’ नामक ही योजना असून या योजनेंतर्गत पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये व नागरिकांना त्यांना आवडेल ते झाड मनपा पुरविणार आहे. त्या मोबदल्यात रोपांच्या किमतीपैकी केवळ अर्धी किमत रोपे नेणाऱ्यांना मनपाकडे जमा करावी लागेल. एक वर्षांंनंतर मनपाच्या एका पथकाकडून या झाडांची पाहणी केली जाईल. ज्यांनी झाडे जगविली, त्याचे संवर्धन केले, त्यांच्याकडून घेतलेले अर्धे पैसेही मनपा परत करेल, असे या योजनेचे स्वरुप आहे.
या योजनेसाठी महानगरपालिकेने एकूण ९० प्रजातीचे वृक्ष आझाद बगिच्यात उपलब्ध केले आहे. यात चंपा, फायकस, विद्या, रॉयल पाम, साईकस, टेबल पाम, जास्वंद, रजनीगंधा, क्रोटन, अशोका, नारळ, शमी, करवंद, एक्सझोरा, रामफळ, निंबू, आवळा आदी प्रजातींचा यात समावेश आहे.
एवढ्या प्रजाती उपलब्ध असल्याचे महानगरपालिका सांगत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना आवडेल ते झाड पुरविण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरत आहे. काही युवतींनी येथील आझाद बागेत जाऊन गुलाबी चाफा, पिवळा चाफा या वृक्षांची मागणी केली. मात्र सदर रोपे उपलब्ध नाही, काही दिवसांनी या, असे सांगण्यात आले. अनेक जणांसोबत असाच प्रकार घडला. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेले नागरिक पहिल्यांचा परत जातात. त्यानंतर नागरिकांचा विश्वास उडाल्याने ते दुसऱ्यांदा रोपे मागायला जात नाहीत. त्यामुळे या योजनेला मनपाकडूनच ग्रहण लावले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रतिसाद देणे कमी केले आहे.
मनपाने पहिल्या टप्प्यात येथील आझाद बागेत एकूण १८ हजार ५९५ विविध प्रजातींची रोपे उपलब्ध केली आहे. मात्र यापैकी केवळ एक हजार ४०८ रोपांची विक्री होऊ शकली. उर्वरित रोपे मनपाकडेच पडून आहेत. याबाबत मनपाचे अभियंता रविंद्र हजारे यांनी सांगितले की बहुतांश नागरिक घरी लावता येणाऱ्या रोपांचीच मागणी करीत आहे.
त्यामुळे यातील काही रोपे सध्या संपली आहेत. ती मागविण्यात येत आहे. आता हळूहळू या योजनेची माहिती नागरिकांना होत असल्याने काही दिवसात याला चांगला प्रतिसाद मिळेल. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Eclipse of 'Liked to Tree' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.