गुड खा; सोबतच ‘गुड’ शब्दांचाही वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:19 IST2019-01-19T22:19:06+5:302019-01-19T22:19:49+5:30
भारत हा उत्सवाचा देश आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाज हा हम साथ साथ है म्हणत एकमेकांसाठी जगण्याचा संकल्प करतो. ...

गुड खा; सोबतच ‘गुड’ शब्दांचाही वापर करा
भारत हा उत्सवाचा देश आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाज हा हम साथ साथ है म्हणत एकमेकांसाठी जगण्याचा संकल्प करतो. आनंद वाटण्याचा संकल्प करतो. या माध्यमातून एक परिवार दुसऱ्या परिवाराशी, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी तीन गुळ घ्या, गोड गोड बोला अशी शुभकामना करतो. आयुष्य शेवटी काय आहे? आयुष्य तीन पानांचं पुस्तक. जन्म, मृत्यू आणि कर्म. जन्म, मृत्यू ही दोन पाने तर आपल्या हातात नाही. तिसरे पान कर्म. मग जर आपण या कर्माच्या पानावर या मकरसंक्रांतीच्या उत्सवाच्या निमित्ताने जीवन गोड व्हावे म्हणून गोड शब्दाचा उपयोग करण्याचा संकल्प करीत असू, तर तीच खरी मकरसंक्रात आहे, असे विचार राज्याचे अर्थ व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मकरसंक्रांत या सणाचा अर्थ म्हणजे केवळ गुड खाणे नाही. तर गुड शब्दाचा उपयोग करून कुणाचेही मन दुखावणार नाही. कोणत्याही व्यक्तीला आपल्या वाणीमुळे दु:ख होणार नाही, याची काळजी घेणे म्हणजेच मकरसंक्रांत. म्हणून प्रत्येकाने गोड शब्दाचा उपयोग करून समाजमनाचे हित जोपासत राहावे, असेही ना. मुनगंटीवार यांनी मनोगतात सांगितले.
मनातील राग, मत्सर दूर करून नातेसंबंधात गोडवा निर्माण करणारा सण. प्रत्येकांनी गोड आणि गुड बोलावे. सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने आपसात गोडवा वाढवावा. हा गोडवा विकासाची नाळ थेट जनतेशी जुळविणारा असू शकतो, असा गोड संदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.