उत्सवाच्या काळात दिसेना पोलीस मित्र!
By Admin | Updated: September 1, 2014 23:28 IST2014-09-01T23:28:04+5:302014-09-01T23:28:04+5:30
सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवाच्या काळात पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना समोर आली. यानुसार मागील वर्षी शहरात मोठ्या संख्येने जनजागृती करून

उत्सवाच्या काळात दिसेना पोलीस मित्र!
चंद्रपूर : सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवाच्या काळात पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना समोर आली. यानुसार मागील वर्षी शहरात मोठ्या संख्येने जनजागृती करून शहरातील तरुणांना पोलीस मित्र म्हणून पोलीस प्रशासनाने सहभागी करून घेतले. त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात आले. पोलीस मित्रांनी पोलिसांना सहकार्यही केले. यावर्षी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असतानाही पोलीस मित्र दिसेनासे झाले आहे. त्यांचा सहभागही मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झाला आहे.
इतर दिवसांच्या तुलनेमध्ये सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवामध्ये पोलिसांवर कामाचा ताण येतो. अशावेळी शांतता आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांची अक्षरश: तारांबळ उडते. यातुन पोलिसांची काही प्रमाणात का होईना सुटका व्हावी, त्यांच्यावरील ताण कमी व्हावा सोबतच नागरिकांच्या सहकार्यातून शांतता, सुव्यवस्था ठेवण्यास मदत व्हावी, पोलिसांच्या कामाची पद्धत तरुणांना समजावी आणि गुन्हेगारीवर आळा बसावा या हेतून पोलीस मित्र संकल्पना समोर आली. मागील वर्षी जिल्हा पोलीस प्रशासन, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे डॉ. गोपाल मुंधडा यांच्या माध्यमातून ही संकल्पना साकार करण्यात आली. यासाठी मोठा गाजावाजाही करण्यात आला. पोलिसांच्या आवाहनानुसार शहरातील अनेक तरुणांनी पोलीस मित्र म्हणून अर्ज सादर केले. त्यानंतर तरुणांची निवड करून त्यांना ‘पोलीस मित्र’ म्हणून ओळखपत्र, टी शर्ट, कॅप सुद्धा देण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देवून पोलिसांच्या कामाची पद्धत, सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांना सांभाळण्याचे कौशल्य आदीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा उपयोग मागील वर्षी झालेल्या गणेशोत्सव तसेच इतर कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने झाला. गणेश विसर्जनाप्रसंगी पोलीस मित्रांची कामगिरी वाखान्याजोगी होती. या कार्याची जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दखल घेत त्यांचे कौतुक केले. हे सर्व केले असतानाही यावर्षी मात्र पोलीस मित्रांचा सहभाग कमी आहे. मागील वर्षी तीनशेच्या जवळपास असलेल्या पोलीस मित्र यावर्षी नेमके किती आहे हे सुद्धा कळू शकले नाही. सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र पोलीस मित्रांना अद्यापही पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले नसून त्यांची मदतही मागितली नाही. (नगर प्रतिनिधी)