पावसाच्या दडीमुळे धान पीक संकटात

By Admin | Updated: August 30, 2016 00:39 IST2016-08-30T00:39:54+5:302016-08-30T00:39:54+5:30

तालुक्यात पावसाचे उशिरा आगमन झाले. सरासरी पावसाच्या ५५ टक्के पाऊस तालुक्यात पडला.

Due to the rainy season due to rain paddy crop crisis | पावसाच्या दडीमुळे धान पीक संकटात

पावसाच्या दडीमुळे धान पीक संकटात

बळीराजा चिंतातूर : तीन आठवड्यापासून पाऊस गायब
रवी रणदिवे ब्रह्मपुरी
तालुक्यात पावसाचे उशिरा आगमन झाले. सरासरी पावसाच्या ५५ टक्के पाऊस तालुक्यात पडला. उशिरा रोवणी झाल्याने धान पीक सध्या गर्भात आहे. मात्र आता पावसाने तब्बल तीन आठवड्यापासून दडी मारल्याने धान पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे आता एका दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात बहुतांश शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम करण्यासाठी १९८१ ला गोसीखुर्द धरणाचे भूमिपूजन करुन शेतकऱ्यांच्या आनंदात थोडीसी भर घातली होती. पण ३५ वर्षाचा काळ लोटूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचले नाही. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवं दाटून आली आहे. या पाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागला होता. रणमोचन, खरकाडा, पिंपळगाव, रुई, निलज, पाचगाव व किन्ही या भागातील शेतकरी एका पाण्यासाठी मागील दोन वर्षापासून अनेकांचे दार ठोठावत आहेत. पण कुणीही दार उघडून त्यांची समस्या समजून घेतली नाही. प्रत्येकांनी हात वर करुन एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. दुसरीकडे एका पाण्यासाठी उभ्या शेतातील पीक मरताना दिसत आहे. यामुळे हतबल होऊन संतापलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर- गडचिरोली राज्य मार्ग रोखून तीन तास वाहतूक अडवून धरली व आपली पाण्याची मागणी रेटून धरली होती. रस्ता रोको सुरु असताना आभाळातून पाऊस सुरु झाला. पण कुणीही मागे हटले नाही. पावसात ओले होऊनही मागणीसाठी रस्ता रोको सुरु होता. या प्रकारावरुन शेतकऱ्यांच्या मनातील पाण्याची निकड व प्रशासकीय यंत्रणेवरील उद्रेक लक्षात येतो आहे. केवळ ४५ मीटरच्या मागे पाणी पोहचते व पुढे पाणी पोहचत नाही, हे विभागाचे दुर्दैवच असल्याचे बोलले जात आहे. केवळ ही बाब या भागापुरतीच मर्यादित नाही तर अन्य भागातसुद्धा गोसीखुर्दच्या पाण्याविषयी हीच स्थिती आहे. हा जनक्षोभ आज किन्ही येथे दिसला उद्या कुठे तरी तालुक्याच्या अन्य भागात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संबंधित विभागाने हा मुद्दा समजून रखडलेली कामे तातडीने करावी. जेणेकरुन डोळ्यासमोरचे पीक मरताना शेतकऱ्यांना बघावे लागणार नाही. तालुक्यात उशिरा रोवणी झाली. त्यातही २० दिवसांपासून पाण्याने दडी मारली आहे. दरम्यान दररोज वातावरण ढगाळलेले होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत आहे. या प्रकारामुळे पिकांवर लष्करी अळी, तुळतुळा आदी रोगाने धान पिके ग्रासलेली होती. एकीकडे पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे धानावर रोग अशा द्विधा मनस्थितीमध्ये या तालुक्यातील शेतकरीवर्ग सापडलेला आहे. अशा वेळी शासनाने मदतीचा हात म्हणून किटकनाशके औषधी विनामूल्य देऊन शेतकरी अश्रू पुसण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संपूर्ण शेतकरीवर्ग संतापलेला आहे. सध्या उन्हाळ्यासारखे ऊन तापायला लागले आहे. त्यामुळे तालुक्याचे तापमान वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे शेतातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाच्या सोयी आहेत, अशा शेतकऱ्यांवर विजेचे संकट उभे ठाकले आहे. २४ तासातून बारा ते सोळा तास भारनियमनामुळे ग्रामीण भागातील वीज गायब राहते. शेतीला पाणी केव्हा द्यायचे आणि जेवायचे, झोपायचे केव्हा, हेच शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे. एकूणच तिहेरी संकट सध्या या भागातील शेतकऱ्यासमोर उभे आहे. या महिन्यात भारनियमन केले नाही तर किमान जलसिंचन चांगले होईल व पिकाला पाणी मिळेल, अशी आशा बाळगणारा बळीराजा आशेवरच आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन भारनियमन बंद करावे अशीही मागणी केली जात आहे.
गोसीखुर्दचे पाणी न मिळणे, वेळेवर पाऊस न येणे, भारनियमन मोठ्या प्रमाणात होणे व रोगांचा पादुर्भाव पसरणे आदी कारणांनी शेतकरीवर्गात चिंता पसरली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Due to the rainy season due to rain paddy crop crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.