Due to the pollution, the identity of Chandrapur has become black | प्रदूषणामुळे चंद्रपूरची ओळख काळवंडली
प्रदूषणामुळे चंद्रपूरची ओळख काळवंडली

ठळक मुद्देअधिवेशनात होणार का चर्चा? : कोळसा खाणी, वीज केंद्राकडून नियमांची पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रदूषित शहरांच्या सेपी स्कोरनुसार चंद्रपूर राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. चंद्रपूरचा सेपी स्कोर ७६.४१ आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, विपुल वनसंपदा आणि नद्यांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख होती. मात्र सध्या प्रदूषणामुळे चंद्रपूरची ओळख काळवंडली आहे.
विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर हे संसदेत याबाबत भाष्य करून सभागृहाचे लक्ष वेधत केंद्र शासनाला जाब विचारणार आहे. यासोबत काही दिवसात नागपूर येथे राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात स्थानिक आमदारांनी चंद्रपूरच्या प्रदूषणाबाबतचे गांभीर्य लक्षात आणून देणे अपेक्षित आहे. मात्र हिवाळी अधिवेशन केवळ सहाच दिवस चालणार असल्याने हा गंभीर मुद्दाही चर्चेपासून दूर राहणार आहे.
चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणीसाठी प्रसिध्द आहे. जिल्हाभर पसरलेल्या कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, चूनखड्यांची खाण, पेपर मील, राईस मिल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे जिल्ह्यात वायू प्रदूषण सर्वाधिक झाले आहे. कोळसा खाणीतून कोळशाची होणारी वाहतूक, शहराजवळचे कोल डेपो व डिझेलच्या वाहनांमुळे वायू प्रदूषणात सर्वाधिक भर पडत आहे, असे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.

संसदेत होणार चर्चा; मात्र राज्याच्या अधिवेशनात काय?
खासदार बाळू धानोरकर हे सोमवारी संसदेत चंद्रपूरच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र शासनाचे लक्ष वेधणार आहेत. जिल्हावासीयांच्या आरोग्यासाठी हे प्रदूषण दिवसेंदिवस घातक होत आहे. त्यामुळे हा गंभीर मुद्दा नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित केला जाणे आवश्यक आहे. मात्र हिवाळी अधिवेशन केवळ फार्स ठरेल काय, अशी भीती आतापासूनच व्यक्त होत आहे. हे अधिवेशन सहा दिवसच चालेल, अशी चर्चा असल्याने प्रदूषणासारखा चंद्रपुरातील गंभीर मुद्दा तसाच कायम राहण्याची शक्यता आहे.

वीज केंद्रातून सर्वाधिक प्रदूषण
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून सर्वाधिक प्रदूषण होत आहे. मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर वीज केंद्र नियमांना तिलांजली देत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर आणि आजुबाजुच्या गावात विषारी वायू नागरिकांच्या जिवावर उठत आहे. या वीज केंद्रातील युनीट क्रमांक १ व २ हे अनेक वर्ष जुने युनीट आहे. युनीट क्रमांक १- १९८३ मध्ये तर युनीट क्रमांक २-१९८४ ला स्थापित झाले आहेत. यातून सस्पेंडेड पर्टीक्युलर मॅटर (एसपीएम) अनुक्रमे ३८१ मिली गॅम पर क्युबिक मीटर आणि ६४३ मिलीग्रॅम पर क्युबिक मीटर दररोज निघत असते. हे प्रमाण सामान्यापेक्षा अधिक आहे. सामान्यता ते १०० मिलीग्रॅम पर क्युबिक मीटर असले पाहिजे. त्याची उंचीही ९० मीटर आहे, जे नियमानुसार नसल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे, असेही खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे. नियमानुसार याची उंची २७५ मीटर असणे गरजेचे आहे. याच कारणामुळे वीज केंद्रातून सर्वाधिक प्रदूषण होत आहे.

कोळसा डेपो हटवा
शहर किंवा गावाजवळच्या मोकळ्या जागेत कोळसा डेपो आहेत. तिथेच कोळसा डम्प केला जातो. चंद्रपूर जिल्ह्याचे प्रदूषण कमी करायचे असेल तर गावाजवळचे कोळसा डेपो दूर अंतरावर स्थलांतरित करून कोळसा डम्प केला पाहिजे. याशिवाय चंद्रपूर वीज केंद्र व काही कंपन्या जे नियमांना तिलांजली देत उत्पादन घेत आहे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. याकडेही खासदार धानोरकर यांनी लक्ष वेधले आहे.

असा आहे प्रदूषणाचा मापदंड
६० सेपी स्कोरच्या आतील शहरे हे प्रदूषित असतात. ६० ते ७० सेपी स्कोर असलेल्या शहारांना अत्यंत प्रदूषित शहर संबोधले जाते तर ७० च्यावर सेपी स्कोर असेल तर अशा शहरांना घातक प्रदूषित श्रेणीत टाकले जाते.

Web Title: Due to the pollution, the identity of Chandrapur has become black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.