डासांच्या उपद्रवाने पंचायत समिती कर्मचारी वैतागले
By Admin | Updated: August 30, 2014 23:34 IST2014-08-30T23:34:59+5:302014-08-30T23:34:59+5:30
शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जबाबदारी पंचायत समिती कार्यालयावर असते. जनप्रतिनिधी व अधिकारी मिळून जनतेपर्यंत

डासांच्या उपद्रवाने पंचायत समिती कर्मचारी वैतागले
आयुधनिर्माणी (भद्रावती) : शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जबाबदारी पंचायत समिती कार्यालयावर असते. जनप्रतिनिधी व अधिकारी मिळून जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवितात. त्यात आरोग्य विषयक जागृती करणे हे पंचायत समितीचेच काम. परंतु याच कार्यालयाच्या दर्शनी भागातील आवारात भला मोठा खड्डा तयार झाला असून हा खड्डा डास पैदास केंद्र बनला आहे. परिणामी खुद्द पंचायत समितीतील कर्मचारी डासांच्या उपद्रवाने वैतागले आहेत. पंचायत समितीत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही या डासांचा सामना करावा लागत आहे. परिणामी मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार नागरिकांना होण्याची शक्यता आहे.
या ठिकाणाहून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दिवसातून अनेक वेळा ये-जा करीत असताना त्यांच्या नजरेस पाण्याने भरलेला हा खड्डा पडू नये, यावरुन ते आपल्या कर्तव्याप्रती किती सजग आहेत, याची प्रचिती येते.
भद्रावती शहरात पंचायत समिती कार्यालय आहे. शासनाच्या विविध योजना ग्रामीण स्तरावर पोहोचविण्याचे काम हे कार्यालय करते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक जाणिवा जागृत करणे हे पंचायत समितीचेच काम आहे. पावसाळ्यात रस्त्यावर साचलेले पाणी वा गटारात साठवलेले पाणी त्यातून तयार होणारे डास आरोग्यासाठी घातक ठरतात. या डासांमुळे मलेरिया, फायलेरिया, डेंग्यू यासारखे विविध आजार होतात. संसर्गजन्य आजार टाळण्याकरिता पंचायत समिती प्रशासन ग्रामस्थांना रस्त्यावर व खड्डयात पाणी जमा होऊ देऊ नका, ते पाणी शोष खड्ड्यात जिरवा, असा सल्ला देतात. स्थानगृहे वा शौचालयातील पाणीही शोष खड्डयातच मुरले जाईल, याची ग्रामसेवक खबरदारी घेतात. परंतु अशा योजना राबविण्याची ज्यांची जबाबदारी आहे, अशा पंचायत समितीच्या आवारात मोठा खड्डा आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरीही तो तसाच उघड्यावर असून त्या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होत आहे.
कोणत्याही अधिकाऱ्याने जागृत राहून हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करु नये, याचे ग्रामस्थांना आश्चर्य वाटत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्यांच्या कार्यालयातच अंंधार असल्याची भावना व्यक्त होत आहे. गावागावांत शोष खड्डे खोदून डासांच्या निर्मितीवर प्रतिबंंध करण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याच परिसरातील उघडा खड्डा दिसू नये, याबद्दल ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहे. आजारांसाठी कारणीभूत ठरणारा हा खड्डा एकतर बुजवून टाकावा किंवा त्याचे शोष खड्ड्यात रुपांतर करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)