निधीअभावी मामा तलावातील सौंदर्यीकरणाचे काम झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:43+5:302021-01-16T04:32:43+5:30
मूल : चांदा ते बांदा योजनेंअतर्गत मूल बसस्थानकाजवळील मामा तलावाचे सौंदर्यीकरण झाल्यास शहराला वेगळे रुप येईल. यासाठी चांदा ...

निधीअभावी मामा तलावातील सौंदर्यीकरणाचे काम झाले बंद
मूल : चांदा ते बांदा योजनेंअतर्गत मूल बसस्थानकाजवळील मामा तलावाचे सौंदर्यीकरण झाल्यास शहराला वेगळे रुप येईल. यासाठी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ४९८.९७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाने सन २०१५ - १६ला सादर केले. मंजुरीनंतर प्रत्यक्षात सन २०१८-१९ या वर्षात कामाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूरच्या देखरेखीखाली सुरू झालेल्या या कामावर ३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, सध्या निधीअभावी हे काम बंद करण्यात आले आहे.
मूल शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेला तलाव हा जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखाली येत असल्याने त्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाने तयार केला. तलावाची खरीप हंगामाची सिंचन क्षमता १९२ हेक्टर इतकी आहे. या तलावात नौकाविहाराची सुविधा, उद्यानाची निर्मिती, मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी बोटिंग प्लॅटफार्मची निर्मिती, नवीन रस्ते, उद्यानात कारंजे, लहान मुलांसाठी बालोद्यान, प्रसाधनगृह, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आदींची सोय केली जाणार आहे. याचबरोबर नवीन रस्त्यावर वृक्षारोपण, विद्युत पथदिव्याची उभारणी केली जाणार आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणामुळे नागरिकांना विरंगुळा तसेच फिरणे बसण्यासाठी अप्रतिम स्थळ बनविले जाणार आहे. एवढे झाल्यानंतरही शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार आहे. तसेच कोळी बांधवांचा मत्स्य व्यवसाय सुव्यवस्थित केला जाणार आहे. शेती व मत्स्य व्यवसायाला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. मात्र, निधी संपल्याने काम बंद करावे लागले. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी उर्वरित निधीची मागणी करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. सदर कामासाठी जिल्हाधिकारी यांनी निधी मंजूर केल्यास मूल शहरात निर्माण होणारे अप्रतिम सौंदर्य बघायला मिळण्याची शक्यता आहे.