मूलचे उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी आजारी

By Admin | Updated: August 22, 2015 01:38 IST2015-08-22T01:38:10+5:302015-08-22T01:38:10+5:30

गरिबांना वरदान ठरू पाहणारे मूल येथील उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना योग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे.

Due to lack of basic sub-district hospital medical officers | मूलचे उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी आजारी

मूलचे उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी आजारी

मूल : गरिबांना वरदान ठरू पाहणारे मूल येथील उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना योग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. ५० खाटांचे श्रेणीवर्धन असलेल्या या रुग्णालयात रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अनेक रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत. एकीकडे रुग्णांची वाढती संख्या बघता वैद्यकीय अधिकारी बेजार झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधी जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप केला जात आहे.
तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता एक कोटी ६५ हजार रुपये खर्च करून ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय तयार करण्यात आले. मे २००२ मध्ये या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनप्रसंगी तत्कालिन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याबरोबरच आवश्यक यंत्र व सर्व सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १३ वर्षांचा कालावधी लोटत असतानासुद्धा सदर समस्यांची पुर्तता करण्यास आरोग्य प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींना देखील यश आले नाही. आजच्या स्थितीत एकुण ४६ मंजूर पदापैकी २७ पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित १९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी महत्त्वाचे वैद्यकीय अधिक्षकाचे एक पद व वैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त आहेत. तसेच अधिपरिचारिका वर्ग तीनच्या १२ पदांपैकी सहा पदे रिक्त आहेत. या सहा पदांपैकी एक वैद्यकीय कारणास्तव तर एक स्पर्धा परीक्षेत निवड झाल्याने फक्त चार अधिपरिचारिका कार्यरत आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यात अधिक्षकपदाचा कार्यभार डॉ. अनिल गेडाम यांच्याकडे आहे. उर्वरित उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार डॉ. लाडे व डॉ. पेंदोर यांच्याकडे भार आहे. डॉ. गेडाम यांना प्रशासकीय काम व सभा यातच त्याचा वेळ जातो.यातच १४ सप्टेंबरला डॉ. पेंदोर यांच्या नियुक्तीची मुदत संपत असल्याने पुन्हा वैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता भासणार आहे. तज्ज्ञांचा अभाव असल्याने ‘आयुध’ कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने सेवा पुरविण्याचा प्रयत्न आहे. मात्र सदर सेवा तोतडी स्वरूपाची आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to lack of basic sub-district hospital medical officers