औद्योगिक तालुक्यात कामगारांवर उपासमारीची पाळी
By Admin | Updated: March 16, 2017 00:46 IST2017-03-16T00:46:43+5:302017-03-16T00:46:43+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

औद्योगिक तालुक्यात कामगारांवर उपासमारीची पाळी
परप्रांतीयांचा भरणा : बेरोजगारीच्या समस्येत वाढ; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
आवाळपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. मात्र स्थानिक कामगारांना काम नसल्याने आणि सिमेंट कारखान्यातील कामगारांना कामावरून काढत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यातील खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने नामवंत सिमेंट उद्योग समुहांनी प्रकल्पांची उभारणी केली आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या मुलांना रोजगार मिळेल, या आशेवर त्यांनी शेती अल्पदरात त्या उद्योगांना उपलब्ध केली. त्या मोबदल्यात काही लोकांना रोजगार देण्यात आला. त्यावेळी गावकऱ्यांनी सिमेंट उद्योगाचा कोणताही दुष्परिणाम लक्षात न घेता त्यांचे स्वागतच केले. त्यामुळे तेथे कारखाने सुरु झाले. त्यातून कोट्यवधीचे उत्पादनही होऊ लागले.
मात्र त्यानंतर आश्वासन दिल्याप्रमाणे येथील गावांचा विकास आणि स्थानिक नागरिकांना कुशल कामगार म्हणून नियुक्ती देताना कंपनीने आपला रंग दाखवण्यास सुरूवात केली.
काही स्थानिक कामगारांनी १५ वर्षे संघर्ष केला. आजही काही कारखान्यात कामगारांची दयनीय स्थिती दिसून येते.
कारखान्यांनी शेतजमिनी अल्प दरात घेवून नोकरी देण्याची कबुली केली होती. मात्र अजूनही स्थानिक युवकांना कुशल कामगार म्हणून घेण्यात आले नाही. त्यांना डावलून त्यांचावर अकुशल कामगार म्हणून ठपका लावला जातो. त्याच वेळी कुशल कामगार म्हणून परप्रांतीयांचा भरणा केला जातो. स्थानिक सुशिक्षित बेरोजगाराची फौज निर्माण झाली असून त्यांच्या हाताला काम नाही. या कारखान्यांमधील कामगारांनी कामगार संघ स्थापन केले आहेत. परंतु तेदेखील नाममात्र झाले आहेत. त्यांचा दबाव नसल्याने कारखान्यात परप्रांतीय कामगारांचा भरणा वाढतच चालला आहे. या सर्व समस्येवर मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी कायमचे दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर)
१५ दिवसांतून एकदा काम
तालुक्यातील कारखान्यांमध्ये रोजगार मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक शहरामध्ये तंटपुज्या मानधनावर काम करीत आहे. तांत्रिक कुशल व अकुशल युवक आपल्याला स्थानिक कंपनीमध्ये रोजगार मिळेल, या आशेवर जगत आहेत. आजही काही कारखान्यात रोटेशन तत्वावर जवळपास ५०० कामगार काम करीत आहेत. त्यांना कधी कामावर घेतले जाते तर कधी १५ दिवसांमधून एखाद्या दिवशी काम दिले जाते. कामगाराच्या हाताला काम नसल्याने ते भाजीपाला, घर बांधकाम आणि टॅ्रक्टरचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवित आहेत.
प्रदूषणामुळे विविध आजार
कारखान्याच्या विषाक्त धुरांमुळे वातावरण प्रदूषित होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजाराने ग्रासले आहेत. प्रदूषणामुळे कारखान्याजवळील शेतीलासुद्धा त्याचा मोठा फटका बसत आहे. प्रदूषणामुळे पिकावर प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट होत आहे.