कानपा परिसरात दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: December 6, 2014 22:46 IST2014-12-06T22:46:06+5:302014-12-06T22:46:06+5:30
नागभीड तालुक्यातील कानपा परिसर हा धानपट्टा म्हणून ओळखल्या जातो. यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी पीकही

कानपा परिसरात दुष्काळाचे सावट
कानपा : नागभीड तालुक्यातील कानपा परिसर हा धानपट्टा म्हणून ओळखल्या जातो. यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी पीकही हातचे जाण्याची शक्यता आहे. परिणामी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
कानपापासून काही अंतरावर असलेल्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचाही या परिसरातील शेतीला सिंचनासाठी फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. यावर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील धानाची पेरणी खोळंबली. पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. रोवणीच्या वेळी अपेक्षेनुरूप पाऊस न पडल्याने काही शेतकऱ्यांनी जिवाचा आटापीटा करून मोटारपंपाच्या सहाय्याने नदी, नाल्यातील पाणी ओढून रोवणी केली. ऐन पीक भरात असताना पावसाने दगा दिला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, अशांनी शेत सिंचन करून पिक वाचविण्याची धडपड केली.
असे करूनही शेतकऱ्यांचे हाती पीक आले नाही. जनावरांना वर्षभर पुरेल इतके वैरणही निघाले नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी शेतकरी वर्षभराची चिंता करू लागला आहे. संसाराचा गाडा, घेतलेले कर्ज, मुलामुलींचे शिक्षण, विवाह, वर्षभर जनावरांच्या वैरणाची व्यवस्था, खरीप पिकाकरिता बि-बियाणे, खते व किटकनाशकांचे नियोजन आदींची चिंता कानपा व परिसरातील शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे.
सातत्याने येणाऱ्या संकटांना अंगावर झेलत बळीराजा मोठ्या अपेक्षेने शेतीचे नियोजन करतो. परंतु त्याचे फुटके नशीब त्याला साथ देत नाही. परिसरातील काही वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून ५०-६० वर्षाच्या काळात यावर्षी सारखी परिस्थिती कधीच पाहिली नाही. ज्या शेतकऱ्यांना दरवर्षी १०० पोती व्हायची त्याच जागी १५-२० पोती धानावर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे? वर्षभर संसार चालवायचा कसा? असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागले आहेत.
गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांवर कोणते ना कोणते संकट ओढवत आहे. कधी ओल दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेतकऱ्याच्या समस्यांकडे लक्ष देवून शासनाने योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)