पाण्याची मुबलकता;तरीही टंचाई

By Admin | Updated: May 30, 2014 23:34 IST2014-05-30T23:34:47+5:302014-05-30T23:34:47+5:30

सावली तालुक्यातील भुगर्भात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही नागरिकांना अनेकदा पाणी टंचाईच्या संकटांना सामोरे जाण्याची पाळी येत आहे. यासाठी शासकीय यंत्रणा जबाबदार आहे.

Due to the abundance of water; | पाण्याची मुबलकता;तरीही टंचाई

पाण्याची मुबलकता;तरीही टंचाई

उदय गडकरी - सावली
सावली तालुक्यातील भुगर्भात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही नागरिकांना अनेकदा पाणी टंचाईच्या संकटांना सामोरे जाण्याची पाळी येत आहे. यासाठी शासकीय यंत्रणा जबाबदार आहे.
सावली तालुक्याची सीमा बारमाही वाहणार्‍या वैनगंगा नदीचे सुमारे ६0 कि.मी. पर्यंत वेढली आहे. शिवाय या तालुक्यातून आजही अनेक जीवंत नाले आहेत. परंतु शासकीय यंत्रणेच्या वेळकाढू धोरणामुळे आणि काही कंत्राटदाराच्या मगृरीमुळे अनेक गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पाण्यासाठी अनेक गावातील महिलांना दोन- दोन कि.मी. पर्यंत पायपीट करावी लागत आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने अनेक गावांमध्ये नळ योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या पूर्णत्वास गेल्या नसल्याने गावातील नागरिक नळयोजनेच्या पाण्यापासून वंचित झाले आहे. तालुक्यातील चरु मानकापूर येथील नळ योजना गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहे.
ग्रामपंचायत कमिटी आणि कंत्राटदार यांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे. उसेगाव, जीबगाव, कसरगाव, विहिरगाव, करोली, मालपिरंजी यासारख्या अनेक गावातील जलकुंभ शोभेची वस्तू बनले आहे. कुठे सदोष पाईप लाईन तर कुठे निकृष्ठ दर्जाचे मोटारपंप असल्यामुळे वारंवार त्यांच्यात बिघाड होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसातच असे प्रकार मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे गावकर्‍यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण सावली तालुक्यात कुठेही पाणी टंचाई नसताना केवळ शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ व वेळकाढू व्यवस्थापनामुळे गावकर्‍यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
३२ लाखांचा निधी दोन वर्षांंपासून धूळखात
सावली येथील नळयोजनेची पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे येथील नागरिकांना महिन्यातून एकदा तरी नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गोसीखुर्दच्या मुख्य कालव्याचे काम गत दोन- तीन वर्षांपासून सुरू आहे. त्या खोदकामात सावली येथील नळ योजनेची पाईपलाईन वारंवार फुटत आहे. भविष्यातही अशीच परिस्थिती उद्भवणार असल्याने नव्या पाईपलाईनसाठी संबंधित विभागाने ग्रामीणण पाणी पुरवठा विभाग चंद्रपूर येथे ३२ लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे. नवीन पाईप लाईन टाकल्यास नहराच्या खोदकामापासून कोणताही धोका राहणार नाही. परंतु ग्रामीण पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अतीउत्साही धोरणामुळे ३२ लाखांचा निधी तसाच पडून आहे. १९८५ मध्ये टाकण्यात आलेल्या पाईप लाईनची दुरुस्ती केल्यास गावकर्‍यांना होणारा सततचा त्रास कमी होणार आहे. मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला अजूनही मुहूर्त सापडला नाही. एकदा नहराचे काम पूर्ण झाले तर सततच्या होणार्‍या लिकेजमुळे नहराची पाळ फोडून दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजुने गावकर्‍यांचेच नुकसान आहे.
 

Web Title: Due to the abundance of water;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.