मद्यधुंद पिकअप चालकाने तिघांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:38+5:30
आष्टीकडून गोंडपिपरीकडे हे वाहन (क्रमांक एमएच ३३ जी ०५६०) भरधाव वेगाने येत होते. विशेष म्हणजे मुख्य हायवे सोडून हे वाहन गावाकडील रस्त्याने आले. रस्त्याच्या बाजुला असलेली नाली ओलांडत हे वाहन घरात घुसले. रस्त्याच्या कडेला असलेल्या पंढरी मेश्राम यांच्या घराच्या अंगणात लहान चिमुकले खेळत होती. दरम्यान, पिकअप वाहन घरासमोरील शौचालयाच्या भिंतीला फोडून लहान मुलांच्या अंगावर चढले.

मद्यधुंद पिकअप चालकाने तिघांना चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथे एका मद्यधुंद पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन चिमुकल्यांना चिरडले. यातील एक सात वर्षीय चिमुकली दवाखान्यात नेत असताना दगावली. तर दोघे गंभीर जखमी आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास शुक्रवारी घडली.
आष्टीकडून गोंडपिपरीकडे हे वाहन (क्रमांक एमएच ३३ जी ०५६०) भरधाव वेगाने येत होते. विशेष म्हणजे मुख्य हायवे सोडून हे वाहन गावाकडील रस्त्याने आले. रस्त्याच्या बाजुला असलेली नाली ओलांडत हे वाहन घरात घुसले. रस्त्याच्या कडेला असलेल्या पंढरी मेश्राम यांच्या घराच्या अंगणात लहान चिमुकले खेळत होती. दरम्यान, पिकअप वाहन घरासमोरील शौचालयाच्या भिंतीला फोडून लहान मुलांच्या अंगावर चढले. यात अलेशा पंढरी मेश्राम (७), अस्मित बंडू मेश्राम (१०) रा. नवेगाव वाघाडे, माही बंडू रामटेके (१२) रा. चंद्रपूर या तीन चिमुकल्यांना गंभीर दुखापत झाली. अलेशाला दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला. तर माही आपल्या आजीकडे आली होती. तिलासुध्दा गंभीर दुखापत झाली. गाडी चालक व कंडक्टरसुद्धा गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.