पिण्याच्या पाण्याचे स्रोत झाले प्रदूषित

By Admin | Updated: May 20, 2015 01:43 IST2015-05-20T01:43:44+5:302015-05-20T01:43:44+5:30

चंद्रपूरच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने २०१४-१५ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतीतील ११ हजार २८० ठिकाणच्या ...

Drinking water sources became polluted | पिण्याच्या पाण्याचे स्रोत झाले प्रदूषित

पिण्याच्या पाण्याचे स्रोत झाले प्रदूषित

चंद्रपूर : चंद्रपूरच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने २०१४-१५ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतीतील ११ हजार २८० ठिकाणच्या भूजलाचे नमुने तपासले असता, त्यातील ५ हजार ८९३ नमुने नायट्रेट, फ्लोराईड, क्लोराईड, लोह, पी.एच, अल्कली, टर्बिनटी व हार्डनेसने प्रदूषित आढळले. जिल्ह्यातील सर्वात जास्त भूजल स्त्रोत नायत्रेट आणि फ्लोराईडने प्रदूषित झाले असून ते पिण्यास योग्य नाही. ही समस्या गांभीर्याने त्वरित हाताळावी अन्यथा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ही फार मोठी समस्या होईल, अशी भीती केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या क्षेत्रीय सशक्त समितीचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रपूर हे देशात भूमी/भूजल प्रदूषणात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळेच उद्योगबंदीसुद्धा आहे, चंद्रपूरचा एकूण सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांक ८१.९० आहे. भूमी-भूजल निर्देशांक सर्वाधिक ७५.५० आहे. भूपृष्ठजल (५०.५०) आणि वायू प्रदूषण (५१.७५) मात्र कमी झाले आहे. मागील २०११-२०१२ भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवालसुद्धा प्रा. चोपणे यांनी मुख्यमंत्री व सर्व प्रशासकीय यंत्रणेला दिला होता. परंतु त्यात फारशी प्रगती झाली नाही. १८ मे रोजी पुन्हा नवीन अहवाल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना इमेलद्वारे पाठविण्यात आला. जिल्हा प्रशासनाला व सर्व संबंधित विभागाला तो मिळाला आहे. तसेच यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांच्याशी प्रा. चोपणे यांना चर्चा केली. जिल्हा प्रशासनाची याविषयात लवकरच बैठक बोलावून यावर मार्ग काढणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
निवेदनाच्या प्रति रसायन, खते केंद्रीय राज्यमंत्री हंराज अहीर, वने, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, कार्यपालन अधिकारी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, जि.प. यांना कारवाईसाठी पाठविण्यात आल्यात आहेत. (प्रतिनिधी)

उपाययोजना
नायट्रेटचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीमध्ये रासायनिक खताएवजी सेंद्रीय खत किटक नाशके वापरावी, कमी पाण्याची सिंचन व्यवस्था वापरावी, पीक पद्धत बदलावी, शहरातील सांडपाणी शुद्ध करूनच नदी- नाल्यात सोडावे, कोळसा ज्वलन व वायू प्रदूषण कमी करावे. शासनाने जल शुद्धीकरणासाठी डी- फ्लूराइड, रीव्हर्स ओस्मोसीस, आयोगन एक्ष्चेन्ज, ब्लेन्डिग, इलेक्ट्रो डायलीसीस सारख्या किंवा ज्या सहज शक्य आहे. अश्या यंत्रणा लावाव्या. नागरिक व शेतकऱ्यांना रासायनिक खतामुळे होणारे प्रदूषण व त्यांचे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामाविषयी जागरुक करावे. दूषित विहिरी- कुपनलिका व इ. प्रदूषित जलस्त्रोत त्वरीत बंद करावे, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी आपापल्या विहिरी आणि कुपनलिकेचे पाणी चाचणी करूनच पाणी प्यावे. जी गावे अत्याधिक प्रदूषित आहेत तेथे त्वरीत पर्यायी पाणी पुरवठा करणे अत्यावश्यक आहे. ग्राम पंचायतीने/नागरिकांनी तशी मागणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे लाऊन धरावी.

प्रदूषणाची कारणे
चंद्रपूर जिल्हा हा खनिजाचा भूप्रदेश असल्यामुळे नैसर्गिक प्रदूषके जमिनीत आहेच. परंतु उद्योगांचे जल-वायू प्रदूषण, शहरातील सांडपाणी आणि शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर व अतिसिंचनामुळे भूजल प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील वाढलेले नायट्रेटचे प्रमाण हे कृषी क्षेत्रात रासायनिक खतांचा मोठा वापर व सिंचन, थर्मल पॉवर स्टेशन व कोळश्यावर आधारित उद्योग आणि नैसर्गिक कारणामुळे आहे. फ्लोराईडचे प्रमाण वाढविण्यासाठी नैसर्गिक कारणासोबत काही रासायनिक उद्योग, आणि शहरातील सांडपाणी जबाबदार आहे. क्लोराईडचे प्रमाण हे नैसर्गिक तसेच सांडपाणी, उद्योग व सिंचनामुळे वाढलेले आहे. लोहखनिज हे नैसर्गिक कारणामुळे आहे. एकूणच जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे.

Web Title: Drinking water sources became polluted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.