देवपायली येथील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:45+5:302021-04-27T04:28:45+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील देवपायली येथील ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेले नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात ...

देवपायली येथील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे
सावरगाव : नागभीड तालुक्यातील देवपायली येथील ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेले नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्रा. पं. सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोपही ग्रा. पं. सदस्यांनी केला आहे.
देवपायली ग्रामपंचायत अंतर्गत शासनाच्या १४ व्या वित्त आयोग योजनेतून नाली बांधकाम करण्यात आले. ते पूर्ण सुद्धा झालेले आहे. मात्र अल्पावधीच ते खचत चालले आहे. यावरून सदर नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. प्रत्यक्ष बांधकामावर न येता कंत्राटदाराचे हित लक्षात घेऊन संबंधित विभागाचे अभियंता यांनी मूल्यमापन कसे काय केले, असा प्रश्न तक्रारकर्ते ग्रा.पं. सदस्यांनी केला आहे. संबंधित निकृष्ट कामासंदर्भात नागभीड पंचायत समिती सभापती व संवर्ग विकास अधिकारी यांना दि.१ एप्रिल रोजी चौकशी करण्याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याचे ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे. सदर नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे होऊनही ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी कामाचे बिल कंत्राटदाराला दिले आहे. ते कसे काय देण्यात आले, असाही प्रश्न ग्रा. पं. सदस्यांनी उपस्थित केला आहे. यावरून आर्थिक व्यवहारात गौडबंगाल झाला असल्याची चर्चा देवपायलीवासीय करीत आहेत. दरम्यान सदर नाली बांधकामाची त्वरित चौकशी करण्यात यावी,असी मागणी ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर नवघडे, वैशाली भोयर,ज्योती मडावी या ग्रामपंचायत सदस्यांनी तथा ग्रामवासीयांना केली आहे.