डाक्युमेंट्री फिल्म फेस्टीवल चंद्रपूरकरांसाठी मेजवानीच !
By Admin | Updated: February 26, 2017 00:41 IST2017-02-26T00:41:26+5:302017-02-26T00:41:26+5:30
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय फिल्म डिव्हीजनच्या वतीने सुरू असलेल्या तीन दिवसीय चांदा इंटरनॅशनल डाक्युमेंट्री फिल्म फेस्टीवलचे ....

डाक्युमेंट्री फिल्म फेस्टीवल चंद्रपूरकरांसाठी मेजवानीच !
उत्तम प्रतिसाद : चर्चा, मार्गदर्शन आणि फिल्म प्रदर्शनातून दिली जाते माहिती
वसंत खेडेकर चंद्रपूर
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय फिल्म डिव्हीजनच्या वतीने सुरू असलेल्या तीन दिवसीय चांदा इंटरनॅशनल डाक्युमेंट्री फिल्म फेस्टीवलचे शुक्रवारच्या सायंकाळला झालेल्या देखण्या उद्घाटन समारंभानंतर तेथेच माहितीपटाचे निर्माते व दिग्दर्शक मईक पांडे यांनी बनविलेला ‘शोर्स आफ सायलेंस’ हा शार्क माशावर बनविलेला इंग्रजी भाषेतील २४ मिनिट चाललेल्या माहितीपट दाखविण्यात आला. जगातील काही मोजक्या भागातील समुद्रामधील शार्क जातीचा विशाल आकाराचा मासा भारताच्या काही भागातील विशेषत: गुजरातच्या सौराष्ट्र या भागात आढळतो. मच्छीमार समुद्राच्या खूप आत जाऊन मोठ्या युक्तीने शार्क माशांची शिकार करतात. त्यांच्या मांस विक्रीतून पैसे कमावतात व त्याच्या तेलाचा विविध प्रकारे उपयोग करीत असतात. त्याचे जिवंत चित्र या माहिती चित्रपटातून दाखवून या माशांचे समुद्रात असणे पर्यावरणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे आणि या जातीच्या माशांची संख्या नगण्य असल्याने त्याची हत्या होऊ नये असा संदेश पांडे यांनी या माहिती पटाद्वारे दिला आहे.
पांडे हे पर्यावरण प्रेमी व त्याचे विशेषज्ञ आहेत. त्यांना वृक्ष, प्राणी, जीव जंतू यांची त्यांच्या उपयोगितेची भरपूर माहिती आहे. हा माहितीपट संपल्यानंतर या विषयावर ते सुमारे १५ मिनीट बोलले. त्यातून पर्यावरणाबाबत त्यांचे मनात असलेली तळमळ दिसून आली. पांडे यांच्या या व इतर अनेक माहिती पटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर शुक्रवारच्याच रात्री चित्रपती व्ही. शांताराम यांच्यावरील ‘द पियोनरिंग स्पिरीट’ हा संजीत नार्वेकर दिग्दर्शित माहितीपट दाखविण्यात आला. पांडे यांनी नंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. तेथे त्यांनी माहितीपट निर्माण करण्याकरिता घ्यावी लागणारी मेहनत, आर्थिक ताण आणि तो माहितीपट लोकापर्यंत जाण्यात येणारे विविध अडथळे याबाबत प्रश्नोत्तरातून चर्चा केली. व्हाट्सअपवरून मिळणारी माहिती, डिस्कवरी आणि अॅनिमल या टी.वी. वाहिन्या आणि हल्ली चित्रपटगृहामध्ये, पूर्वीसारखे माहितीपटांना न दाखविले जाणे, या कारणांनी माहितीपट लोकापर्यंत पुरेसे पोहचत नाहीत. त्याकरिता शासनाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी निर्माते किरण शांताराम, फिल्म डिव्हीजनचे महानिदेशक मनिष देसाई, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य किर्तीवर्धन दिक्षीत हे उपस्थित होते. देसाऊ यांनी फिल्म डिव्हीजनची माहितीपटाबाबतची भूमिका याबाबत सांगितले. आज शनिवारला या महोत्सवात लोकांनी उल्लेखनीय उपस्थित लावून चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रम पत्रिकेत दर्शविल्याप्रमाणे चित्रपटांचे प्रदर्शन झाले. चर्चा सत्रात मनिष देसाई यांनी फिल्म डिव्हीजनबाबत माहिती दिली तर पांडे यांनी फिल्म निर्माण यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. हे ऐकण्याकरिता तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. रविवारला समारोप होणार आहे.
शांताराम बापूंची टोपी
चित्रपती स्व.व्ही.शांताराम हे नेहमी एक विशिष्ट प्रकारची पांढऱ्या पिवळट रंगाची टोपी डोक्यावर घालीत असत. त्यांचे पुत्र निर्माते किरण शांताराम हेही हुबेहुब शांताराम बापू लावतात त्याच प्रकारची टोपी नेहमी लावून असलेले दिसतात. या टोपीचा उलगडा किरण शांताराम यांनी उद्घाटन प्रसंगीच्या भाषणातून केला. ते म्हणाले, शांताराम बापूू (वडील) यांची ही टोपी त्यांना अत्यंत प्रिय होती. मी त्यांच्यासोबत ५० वर्षे राहून त्यांच्यापासून खूप काही शिकलो. त्यांचे काम मी पुढे न्यावे असे त्यांना वाटत होते आणि म्हणून जीवनाच्या शेवटच्या वेळेला त्यांनी आपली टोपी मला देत म्हणाले, माझी ही टोपी तू आपल्या डोक्यावर नित्य ठेव. आशीर्वाद स्वरूपाने मी तुझ्या संगे नियमीत आहो हे समज! त्यातून तुला प्रेरणा मिळत राहील. म्हणून, मी ही टोपी सतत डोक्यावर ठेवून असतो.
व्यासपीठ म्हणजे स्टुडिओच !
या कार्यक्रमासाठी असलेले व्यासपीठ फिल्म फेस्टिवल वाटावे असा सजविण्यात आले आहे. जुने बायस्कोप, फिल्मच्या रील, मुहूर्ताप्रसंगी मारण्यात येणारा फटकार हे चित्ररूपाने स्क्रीनच्या दोन्ही बाजूंनी दर्शविण्यात आले होते. ज्येष्ठांना जुन्या आठवणीत घेऊन जाण्याला हे पुरेसे होते.गाजलेले व यशस्वी हिंदी चित्रपट यांचे व्यासपीठाजवळच लहान पोस्टर लावले आहेत. मात्र हिंदीतील मैलाचा दगड ठरलेले ‘मदर इंडिया’ आणि ‘शोले’ या चित्रपटांचा त्यात समावेश नाही. ही गोष्ट अनेकांना खटकत होती.