वाघ असलेल्या क्षेत्रात कुणाला जाऊ देऊ नका
By Admin | Updated: July 28, 2014 23:27 IST2014-07-28T23:27:15+5:302014-07-28T23:27:15+5:30
वन्यप्राणी-मानव संघर्षाबाबत वन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश प्रधान सचिव (वने) प्रवीणसिंह परदेशी यांनी वनविभागाला दिले. वाघ असलेल्या क्षेत्राबाबत परिसरातील

वाघ असलेल्या क्षेत्रात कुणाला जाऊ देऊ नका
मानव-वन्यजीव संघर्ष : प्रवीण परदेशींचे वन विभागाला कडक निर्देश
चंद्रपूर : वन्यप्राणी-मानव संघर्षाबाबत वन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश प्रधान सचिव (वने) प्रवीणसिंह परदेशी यांनी वनविभागाला दिले. वाघ असलेल्या क्षेत्राबाबत परिसरातील नागरिकांना अवगत करुन सदर क्षेत्रात नागरिकांना व त्यांच्या गुरांना जाऊ देऊ नका, असे कडक निर्देशही त्यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिले.
पावसाळा सुरू असला तरी जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष थांबलेला नाही. व्याघ्र हल्ल्यात अनेकांचा बळी जात आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत नागपूरचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थ संकल्प, नियोजन व विकास) भगवान व मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) संजय ठाकरे उपस्थित होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात सहा इसमाच्या मृत्यूच्या घटनेने निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत वन विभागांतील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वनविभागाच्या विश्रामगृहात तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी परदेशी यांनी वनविभागाला अनेक सूचना केल्या. २५ जुलै २०१४ रोजी कोठारी परिक्षेत्रांतील पोंभुर्णा उपक्षेत्रांतील कं.नं. ८७ गाव घनोटी येथे रोपवन चौकीदार पांडुरंग आत्राम यांचा वाघाच्या हल्ल्यांत मृत्यू झाला. या ठिकाणी प्रवीणसिंह परदेशी यांनी भेट दिली. या ठिकाणी एक वाघीण व दोन छावे असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले. अशा परिस्थितीमध्ये तीन वाघाना पिंजऱ्यांमध्ये पकडणे किंवा बेशुद्ध करुन ताब्यात घेणे अतिशय कठीण काम असल्यामुळे त्यांना सावज बांधून किंवा बेट लावून त्यांना मानवी वस्तीपासून दूर जंगलाच्या दिशेने हुसकावणे, तसेच कॅमेराद्वारे फोटो घेऊन संनियत्रण आदी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.वाघ असलेल्या क्षेत्राबाबत सर्व परिसरांतील नागरिकांना अवगत करुन सदर क्षेत्रात नागरिकांना व त्यांच्या गुरांना जावू देऊ नये, याबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. त्यानंतर परदेशी यांचा ताफा पोंभुर्णा येथे गेला. तिथे सभा घेऊन केमारा, भसारा, देवई, चिंतलधाबा, सदर गट्टा, घनोटी, पोंभुर्णा या गावांचे सरपंच व अध्यक्ष, वनसंरक्षण समिती, चिंतलधाबा, अध्यक्ष वनसंरक्षण समिती घनोटी व इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन त्यांना सुद्धा उपाययोजनाबाबत अवगत केले.(शहर प्रतिनिधी)