विश्वगुरूच्या पदावर जाण्याची भारताची संधी दवडू नका
By Admin | Updated: February 7, 2016 01:45 IST2016-02-07T01:45:28+5:302016-02-07T01:45:28+5:30
भविष्यात विश्वगुरूच्या पदावर जाण्याची संधी भारतालाच आहे. कारण पुढच्या २०२० मध्ये जग वार्धक्याकडे झुकले असताना मानव संसाधनामध्ये नेतृत्व करण्याची संधी केवळ भारताकडेच असेल.

विश्वगुरूच्या पदावर जाण्याची भारताची संधी दवडू नका
देवेंद्र फडणवीस : नवभारत विद्यालयाचा अमृत महोत्सव सोहळा
मूल : भविष्यात विश्वगुरूच्या पदावर जाण्याची संधी भारतालाच आहे. कारण पुढच्या २०२० मध्ये जग वार्धक्याकडे झुकले असताना मानव संसाधनामध्ये नेतृत्व करण्याची संधी केवळ भारताकडेच असेल. कौशल्य विकसित शिक्षण आणि रोजगारातूनच हे शक्य असल्याने त्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्थानिक नवभारत विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार शोभाताई फडणवीस, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, नगराध्यक्षा रिना थेरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब वासाडे, सचिव अनिल वैरागडे, उपाध्यक्ष राम बोकारे, डॉ.प्रशांत वासाडे, डॉ. संजय वासाडे आदी उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळाव्दारा संचालित नवभारत विद्यालयास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा अमृत महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाळेच्या नवीन ८० खोल्यांच्या इमारतीचे लोकार्पण तसेच शाळेच्या वि.तु. नागपुरे विद्या मंदिर अशा नामफलकाचे अनावरही झाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुबलक मनुष्यबळ उपलब्ध असणाऱ्या देशांनी विकासाच्या दृष्टीने चांगली प्रगती केली. भारताकडे उपलब्ध मनुष्यबळाचे मानव संसाधनात परिवर्तन करणे गरजचे आहे. भविष्यात जगाला विकसित मनुष्यबळाची मोठया प्रमाणावर गरज भासणार आहे. जगाची ही गरज केवळ भारतच पूर्ण करु शकतो. त्यामुळेच युवा शक्तीला कौशल्य विकासाची जोड देण्यासाठी देशासह राज्यात मोठया प्रमाणावर प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जगाच्या आयुर्मानानुसार २०१६^ मध्ये भारताचे वय सरासरी २५ वर्षे आहे, २०२० मध्ये ते २९ वर्षे असेल. त्या तुलनेत अन्य देशाचे वय वाढलेले असल्याने जगाच्या अर्थव्यवस्थेचे संचलन करण्यासोबतच जगाला मार्गदर्शन करण्याची भूमिका देशाला बजावावी लागणार आहे. यासाठी कौशल्य विकसित मानव संसाधन उपयोगी ठरणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतीवर वाढलेला भार स्वयंरोजगाराच्या माध्यमातून अन्यत्र वळविण्यासोबतच शेतीची उत्पादकता वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना पाणी, वीज उपलब्ध करुन दिल्यास ते आपल्या शेतीत किमया घडवू शकतात. त्यामुळेच या दोन बाबींवर शासन प्राधान्याने लक्ष देत आहे. विकेंद्िर्रत पाणीसाठे तयार करण्यासाठी जलयुक्तशिवारसारखा कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबविला जात आहे. मामा तलावांच्या दुरुस्तीचे निकष बदलवून त्यांच्या दुरुस्तीसह निधी उपलब्ध करुन देण्यावर भर असून चंद्रपूर, भंडारा, गोदिया व गडचिरोली या जिल्ह्यात सिंचन सुविधेसाठी वेगवेगळ्या उपचार पध्दती अंवलंबिण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, कौशल्य विकसित प्रशिक्षणच तरुणांना रोजगार देवू शकते. याची गरज ओळखून पंतप्रधानांनीही ही संकल्पना देशात राबविणे सुरू केले आहे. कोणीही बेरोजगार राहू नये, रोजगारात देश मागे राहू नये यासाठी ‘मेक ईन इंडिया’ ही संकल्पना राबवली जात आहे. यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांनीही प्रशिक्षणावर भर द्यावा, राज्यात आणि केंद्रात त्यासाठी विकासाची गती देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
आ. शोभाताई फडणवीस यांचेही भाषण झाले. वि.तू. नागापुरे यांनी स्थापन केलेल्या या शाळेमागील इतिहासाचे पट त्यांनी भाषणातून उलगडले. स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या तेव्हाच्या कौलारू शाळेने आता प्रगती साधली असून त्यामागे बाबासाहेब वासाडे यांचे परिश्रम असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब वासाडे यांनी केले. विदर्भाच्या विकासासाठी इस्त्रायली तंत्रज्ञान, शेतीच्या शास्वत विकासाच्या दृष्टीने योजना आखण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त कलेली. या विकासासाठी टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी मॅचसारख्या धोरणाने निर्णयाचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संचालन जेष्ठ संपादक बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार अनिल वैरागडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)