गाळपेरास परवानगी नाकारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:28 IST2019-02-10T21:27:48+5:302019-02-10T21:28:06+5:30
माळढोक आणि सारस या पक्षांचे अधिवास संवर्धनासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, यापुढे पक्षी अधिवास बाधक प्रकल्पावर बंदी घाला व गाळपेर करण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असा एकमुखी ठराव १९ व्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनात पारित करण्यात आला.

गाळपेरास परवानगी नाकारावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : माळढोक आणि सारस या पक्षांचे अधिवास संवर्धनासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, यापुढे पक्षी अधिवास बाधक प्रकल्पावर बंदी घाला व गाळपेर करण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असा एकमुखी ठराव १९ व्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनात पारित करण्यात आला.
चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात १९ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूरच्या इको प्रो संस्थेच्या यजमानपदाखाली पार पडले. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्य संरक्षक संजय ठाकरे, ताडोबा कोअरचे उपसंचालक नानासाहेब लडकत, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे योगेश दूधपचारे, सार्डचे प्रकाश कामडे, इको प्रोचे पक्षी विभाग प्रमुख बंडू दुधे यांची उपस्थिती होती.
संमेलनाध्यक्ष दिलीप वीरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन ठराव पारित करण्यात आले. माळढोक आणि सारस या पक्षांच्या अधिवासात बाधक ठरणारे प्रकल्प घेण्यात येऊ नयेत, तलाव आणि धरणातील पाणी जसे ओसरले जाते, तसतसे त्या जागेत शेती केली जाते. हा अधिवास पक्षी व प्राण्यांसाठी अतिशय महत्वाचा असल्यामुळे गाळपेर करण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असेही ठरावात म्हटले आहे.
पहिल्या दिवशी दोन सत्र पार पडलीत. पहिल्या सत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील ‘पक्षी अधिवास व संवर्धन’ या विषयावर मंथन झाले. सत्राच्या अध्यक्षस्थानी निवृत्त वनाधिकारी संजय ठाकरे होते. यासत्रात सार्डचे प्रकाश कामडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षी जगताचा व त्यांना असलेले धोक्याचा आढावा सादर केला. दुसऱ्या सत्रात विदर्भातील माळराने, पक्षी संरक्षण व संवर्धन यावर भंडारा येथील ज्येष्ठ पक्षी मित्र राजकुमार जोब यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. वाशीम येथील अभ्यासक मिलिंद सावदेकर यांनी झिटिंग सिस्टीकोला या पक्ष्याच्या विणीचा अभ्यास शास्त्रशुध्द्ध पद्धतीने मांडला. चर्चेत अनेकजण सहभागी झाले होते.