विभागीय आयुक्तांचे आदेश : चंद्रपूरचा बदलणार चेहरामोहरा
By Admin | Updated: July 26, 2014 01:42 IST2014-07-26T01:42:39+5:302014-07-26T01:42:39+5:30
चंद्रपूर शहराच्या दुर्दशेत सुधारणा करण्यासाठी आता

विभागीय आयुक्तांचे आदेश : चंद्रपूरचा बदलणार चेहरामोहरा
अवैध बांधकामांची होणार वीज ‘गुल’
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या दुर्दशेत सुधारणा करण्यासाठी आता महानगरपालिकेने कंबर कसली आहे. अवैध बांधकाम, अतिक्रमण व शहर विकासाच्या नियोजनाबाबत मनपा प्रशासन गंभीर झाले आहे. रस्ते, मोकळ्या जागा व आरक्षित जागेवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्यांवर मनपाने करडी नजर ठेवणे सुरु केले आहे. या अनुषंगाने पहिला टप्पा म्हणून मनपाच्या अहवालानंतर विभागीय आयुक्तांनी वीज वितरण कंपनीला अवैध बांधकामाला वीज कनेक्शन न देण्याचे आदेश दिले आहे.
नागपूर येथील विभागीय आयुक्तांनी महावितरणचे चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता यांच्या नावाने २४ जुलै रोजी हे आदेश जारी केले आहेत. यात चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत महानगरपालिकेच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही बांधकामाला वीज कनेक्शन न देण्याचे निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनी हे आदेश महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले असले तरी चंद्रपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठीच ही कार्यवाही असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात अतिक्रमण झालेले आहे. नगर रचना विभागाने टाऊन प्लॉन तयार करताना चंद्रपुरातील मुख्य रस्ते किती फुटाचे असावे, याविषयी ठळकपणे नमूद केले आहे. मात्र एकही रस्ता टाऊन प्लॉनच्या आकडेवारीत ‘फिट’ बसत नाही. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग हे चंद्रपुरातील प्रमुख मार्ग आहेत. मात्र या मार्गावरही व्यावसायिकांनी व नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. शहरातून वाहणारे मोठमोठे नालेही यातून सुटले नाहीत. याबाबत २१ जुलै २०१४ रोजी लोकमतने ‘अतिक्रमण गिळंकृत करतेयं चंद्रपूर ’ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. दरम्यान अवैध बांधकामांवर अंकूश लावण्यासाठी हे आदेश धडकले. याशिवाय शहरातील अवैध बांधकाम, सार्वजनिक ठिकाणी केलेले अतिक्रमण, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन जाण्यास अडथळा निर्माण करणारे बांधकाम, रहिवासाची परवानगी घेऊन केलेले व्यावसायिक बांधकाम यांची एकच यादीच तयार करण्याचे कामही महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू झाले आहे.
याबाबत चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा देत कोणतीही परिस्थिती एकाच वेळी सुधारणे शक्य नाही. ते टप्पटप्प्यानेच शक्य असल्याचे सांगितले. लोकांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. शहराची दुर्दशा सुधारण्यासाठी त्यांचेही सहकार्य अपेक्षित आहे. अवैध बांधकाम व अतिक्रमणाची यादी लवकरच महावितरण कंपनीला वीज कनेक्शन तोडण्यासाठी सुपूर्द केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.(शहर प्रतिनिधी)
‘त्या’ व्यावसायिक बांधकामावरही गदा
महानगपालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय मनपा हद्दीत जी व्यावसायिक बांधकामे सुरू आहेत, त्यांच्यावरही योग्य कारवाई करावी, असेही आदेश विभागीय आयुक्तांनी महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे. यासाठी मनपाकडून त्यासंबंधीचे विवरण प्राप्त करून घ्यावे, असे म्हटले आहे.
यापुढे मनपा हद्दीत कोणालाही वीज कनेक्शन देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र अवश्य घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत या प्रमाणपत्राशिवाय वीज कनेक्श्न देऊ नये, असे विभागीय आयुक्तांनी आपल्या आदेशात बजावले आहे.
चंद्रपूर शहरात मोबाईल कंपन्यांचे ५५ अवैध टॉवर्स उभे आहेत. मनपाच्या परवानगीशिवाय उभ्या असलेल्या या टॉवर्सच्या मालकांना महावितरण कंपनीने रितसर नोटीस बजावून वीज पुरवठा खंडित करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.