जिल्हा रुग्णालयाला १५ एनआयव्ही, दोन मिनी व्हेंटिलेटर्स उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:27+5:302021-04-24T04:28:27+5:30
सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. व्हेंटिलेटर व ...

जिल्हा रुग्णालयाला १५ एनआयव्ही, दोन मिनी व्हेंटिलेटर्स उपलब्ध
सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या सहकार्याने १५ एनआयव्ही अर्थात नॉन इन्व्हासिव्ह व्हेंटिलेटर्स आणि दोन मिनी व्हेंटिलेटर्स जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांसाठी उपलब्ध केले आहे.
शुक्रवारी १५ एनआयव्ही आणि दोन मिनी व्हेंटिलेटर्स आ. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांना सुपूर्द करण्यात आले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, वाढता मृत्यूदर या चिंताजनक वातावरणात प्रामुख्याने व्हेंटिलेटर्सची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा आदी समस्यांनी भर घातली आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे तक्रारी केल्या असता त्यांनी तातडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला व व्हेंटिलेटर्स उपलब्ध होण्याबाबत विनंती केली.
ना. गडकरी यांनीसुद्धा तत्परतेने होकार देत यासंदर्भात तोडगा काढला. १५ नॉन इन्व्हासिव्ह व्हेंटिलेटर्स व दोन मिनी व्हेंटिलेटर्स तातडीने चंद्रपूरला रवाना केले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, उपमहापौर राहुल पावडे, अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टुवार, ब्रिजभूषण पाझारे आदी उपस्थित होते.