‘स्वाईन फ्लू’ साठी जिल्ह्यात अलर्ट
By Admin | Updated: February 8, 2015 23:31 IST2015-02-08T23:31:00+5:302015-02-08T23:31:00+5:30
नागपूर, अमरावती या शहरात स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले असून सावली तालुक्यातील

‘स्वाईन फ्लू’ साठी जिल्ह्यात अलर्ट
चंद्रपूर : नागपूर, अमरावती या शहरात स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले असून सावली तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील रुग्णावर उपचार सुरु आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून ‘स्वाईन फ्लू’ साठी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यात ३ ठिकाणी स्क्रिनींग सेंटर तयार करण्यात आले असून आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३ फेब्रुवारी रोजी सावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष रामभाऊ पगडपल्लीवार (४५) यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ७ फेब्रुवारीला ब्रह्मपुरी येथील देवराव जयराज येनगुरे (४२) यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. पुढील उपचारासाठी त्यांनाही नागपूर येथे पाठविण्यात आले.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कार्यरत असलेले देवराव येनगुले हे आठ दिवसापूर्वी सकाळी फिरत असताना अचानक कोसळले. त्याना ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. तेथील डॉक्टरांनी रक्ताचे नमूने पुणे येथे पाठवून तपासणी केली असता त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. विषम तापमानामुळे स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अचानक वाढलेली थंडी, ढगाळी वातावरण, त्यानंतर तापमानात झालेली वाढ हा बदल ‘एच-वन’ आणि ‘एन-वन’ या स्वाईन फ्ल्यू विषाणूसाठी पोषक ठरणारा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही स्वाईन फ्ल्यूच्या प्रसाराबाबत दक्षता घेतली जात आहे.
स्वाईन फ्ल्यूचा प्रथमदर्शनी हा आजार सहज ओळखता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने रुग्णांमध्ये तीन प्रकारात वर्गीकरण केले आहेत. ए, बी, सी अशी वर्गवारी करून त्या पध्दतीने उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने ग्रामीण भागात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्हिडीओ कॉन्फरसींगच्या माध्यातून सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विषाणूच्या संसर्गाने होणारा आजार असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सुध्दा सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून योग्य साधने पुरविण्यात आली आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)