रेमडेसिविरच्या काळ्याबाजारावरून जिल्हा प्रशासन कडक भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:29+5:302021-04-24T04:28:29+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची वृत्त ‘लोकमत’ने ‘बापरे ! चंद्रपुरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा ...

रेमडेसिविरच्या काळ्याबाजारावरून जिल्हा प्रशासन कडक भूमिकेत
चंद्रपूर : कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची वृत्त ‘लोकमत’ने ‘बापरे ! चंद्रपुरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा दर ३७ हजार?’ या शीर्षकाखाली प्रकाशित करून यंत्रणेचे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाची नियमावलीच तयार केली आहे. इतकेच नव्हे तर काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईसाठी भरारी पथकेही सज्ज केली आहेत; यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारावर कितपत नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे हे कळेलच.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, २३ एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात आल्याचे म्हटले आहे. संबंधित कोविड रुग्णालयांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या संख्येनुसार व औषध पुरवठादारांनुसार तत्काळ हे इंजेक्शन शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार प्राप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड रुग्णालयांनी हा साठा प्राप्त करताना रुग्णालयाच्या लेटरहेडवर सही व शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेेत्याकडे सादर करावयाचे आहे. यावर चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सक, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्यासह आरोग्य यंत्रणेच्या प्राधिकृत आरोग्य अधिकाऱ्यांनी विवरण तक्त्यानुसार वाटप होत आहे वा नाही यावर नियंत्रण ठेवायचे आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचेही निर्देशित केले आहे. भरारी पथकांची नजरही यावर वितरण प्रणालीवर असणार आहे.