दोन हजार अंगणवाड्यांना होणार रेडिओ व स्पिकर्सचे वितरण

By Admin | Updated: May 7, 2016 01:26 IST2016-05-07T01:26:05+5:302016-05-07T01:26:05+5:30

वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील दोन हजार अंगणवाड्यांना रेडिओ तसेच स्पिकर्सचे वितरण करण्यात येणार आहे.

Distribution of radio and speakers to two thousand anganwadis | दोन हजार अंगणवाड्यांना होणार रेडिओ व स्पिकर्सचे वितरण

दोन हजार अंगणवाड्यांना होणार रेडिओ व स्पिकर्सचे वितरण

सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार : पॉवर ग्रीड कंपनीचा सी.एस.आर. निधी
चंद्रपूर: वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील दोन हजार अंगणवाड्यांना रेडिओ तसेच स्पिकर्सचे वितरण करण्यात येणार आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांची एक दिवसीय बाल आकार नामक प्रशिक्षण कार्यशाळा १७ आॅक्टोबर २०५१ ला घेण्यात आली होती. तसेच २०१६-१७ च्या अर्थसंकल्पातसुध्दा राज्यातील १० हजार अंगणवाड्या आदर्श व स्मार्ट म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील १०० अंगणवाडी सेविका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यशदा पुणेद्वारे घेण्यात आले.
ना. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने पॉवर ग्रीड या कंपनीच्या सी.एस.आर. निधीमधून दोन हजार अंगणवाडयांना रेडिओ व स्पिकर्स देण्याचे निश्चित करण्यात आले असून मे २०१६ च्या अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांना सदर रेडीओ स्पिकर्सचे वितरण करण्यात येईल.
चंद्रपूर आकाशवाणीच्या माध्यमातून प्रत्येक आठवडयात एक ते दोन तासांच्या कालावधीत अंगणवाडीतील बालकांसाठी, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी जागृतीपर कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी यशदा पुणे येथील तज्ज्ञ तसेच राज्यातील इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत घेण्यात येईल.
ना. सुधीर मुनगंटीवार हे प्रथमत: सर्व अंगणवाडी सेविकांना आकाशवाणीद्वारे संबोधित करतील. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ० ते ५ वयोगटातील बालकांवर योग्य संस्कार करणे व त्यांची आरोग्यविषयक देखभाल करणे अत्यंत महत्वाचे असून त्यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Distribution of radio and speakers to two thousand anganwadis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.