सरपंचाकडून कोऱ्या रहिवासी प्रमाणपत्राचे वितरण
By Admin | Updated: August 17, 2014 23:05 IST2014-08-17T23:05:23+5:302014-08-17T23:05:23+5:30
अतिसंवेदनशील आणि औद्योगिक क्षेत्र अशी ओळख असलेल्या नकोडा गावातील सरपचांनी स्वत:च्या स्वाक्षरीचे कोरे रहिवासी प्रमाणपत्र वितरण करण्याचा सपाटा सुरु केला आहे.

सरपंचाकडून कोऱ्या रहिवासी प्रमाणपत्राचे वितरण
दुरुपयोगाची शक्यता : नकोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा बेजाबदारपणा
घुग्घुस : अतिसंवेदनशील आणि औद्योगिक क्षेत्र अशी ओळख असलेल्या नकोडा गावातील सरपचांनी स्वत:च्या स्वाक्षरीचे कोरे रहिवासी प्रमाणपत्र वितरण करण्याचा सपाटा सुरु केला आहे. यामुळे या प्र्रमाणपत्राचा दुरुपयोग होऊन भविष्यात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नकोडा हे गाव वेकोलिच्या भूमिगत कोळखा खाणीपासूनच संवेदनशील होते. खाण बंद झाल्यानंतरही अधिक संवदेनशिल क्षेत्र म्हणून या गावाची ओळख आहे. घुग्घुस पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असले तरी, येथे पोलीस चौकी देण्यात आली आहे. नकोडा गावाला लागुनच एसीसी सिमेंट कारखाना आहे. सदर कारखान्यात स्थानिकांना नोकऱ्या, काम द्या अशी सातत्याने मागणी होत असते. मात्र स्थानिकांच्या नावावर बाहेरील नागरिकांना नोकरी दिल्या जात असल्याचा आरोप नेहमी होत असतो. नकोडा ग्राम पंचायतीचे सरपंच ऋषी कोवे यांनी नाव न लिहिता रहिवाशी दाखल्यावर स्वाक्षरी करून दाखला देणे सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात या दाखल्याचा आधार घेऊन अनेक परप्रांतीय नागरिक येथील रहिवासी असल्याचे दाखऊ शकते. अशा प्रमाणपत्राच्या आधारे काही अनुुचित प्रकारही भविष्यात घडू शकतो.
नागरिकांना सरपंच मिळत नाही. त्यामुळे त्यांना दाखला मिळविताना त्रास होऊ नये. या उद्देशाने सदस्यांकडे सरपंचाच्या स्वाक्षऱ्या केलेले दाखले असतात. ते नाव लिहून देतात. यावरुन ते आम्ही किती लोकांचे काम करतो हे दाखवून देत असले तरी, ते चुकीचे असून सत्तेचा दुरुपयोग होत आहे. ग्राम पंचायत एक जबाबदार शासनाचा भाग आहे. ग्रामपंचायत मधील प्रत्येक दाखल्यावर बुक नंबर आणि पान नंबर, पत्र क्र. दिनांक असणे आवश्यक असते. मात्र अलिकडे ही पद्धती नामशेष झाली आहे. दाखल्यावर बुक नंबर लिहिला असतो. मात्र संख्या नसते. दाखला मिळविण्याकरिता सरपंचाच्या नावाने अर्जापूर्वी त्या वॉर्डातील ओळखत असलेल्या वार्ड सदस्यांनी स्वाक्षरी आणि त्याचा शेरा असल्यानंतरच दाखला सरपंचाकडून देण्यात यायला हवा. त्याची नोंदणीसुद्धा ग्रामपंचायतीच्या रेकार्डवर असणे आवश्यक आहे.
या क्षेत्रातील बहुतांश ग्राम पंचायतीमध्ये असा प्रकार सुरू असून रहिवासी दाखल्याची नोंद होत नसल्याचे समजते. याकडे सरपंचासह प्रशासनानेही गंभीर होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)