धम्मभूमी सजली
By Admin | Updated: October 15, 2015 01:02 IST2015-10-15T01:02:23+5:302015-10-15T01:02:23+5:30
१६ आॅक्टोबर १९५६ साली चंद्रपुरात ऐतिहासिक क्रांती घडली. दलित-पीडितांचे मसिहा क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत हजारो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

धम्मभूमी सजली
चंद्रपूर : १६ आॅक्टोबर १९५६ साली चंद्रपुरात ऐतिहासिक क्रांती घडली. दलित-पीडितांचे मसिहा क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत हजारो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या क्रांतीकारी घटनेचा आठवण सोहळा म्हणजे ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ’....! यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्यावतीने चंद्रपुरात अतिशय उत्साहात हा सोहळा पार पडणार असून १५ आणि १६ आॅक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी येथील डॉ.आंबेडकर महाविद्यालय परिसरातील दीक्षाभूमी सजली आहे. कार्यक्रमाची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. १५ आॅक्टोबरला सायंकाळी या सोहळ्याचे उद्घाटन होत आहे.
५९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे उद्घाटन गुरूवारी सायंकाळी ५ वाजता नागपूर येथील भदन्त महापंथ महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे उपाध्यक्ष मारोतराव खोबरागडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहतील. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करून मिरवणुकीद्वारे दीक्षाभूमीकडे प्रयाण करण्यात येईल. त्यानंतर तेथे उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होईल.
१६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर डॉ.बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि कलशासह भिक्खूगण आणि समता सैनिक दलातील सैनिकांच्या सहभागात मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहचेल. त्यानंतर दुपारी १.३० वाजता सामूहिक बुद्धवंदना व आणि धम्मप्रवचन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई राहतील.
विशेष अतिथी म्हणून भिक्खू नागघोष थेरो (नागपूर), भिक्खू करूणानंद (मुंबई), भिक्खू धम्मबोधी (औरंगाबाद), भिक्खू पत्रारत्न (नांदेड), भिक्खू नगाप्रकाश (नागपूर) उपस्थित राहतील.
सायंकाळी ६ वाजता मुख्य समारंभाला सुरूवात होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून खासदार भदन्त अथुरलिये रतन थेरो (श्रीलंका), खासदार तथा आतंरराष्ट्रीय क्रिके टपटू सनथ जयसूर्या, विशेष अतिथी म्हणून भदन्त बोधिसारा थेरो (श्रीलंका), भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो (घुग्घूस), धम्माचारी पद्मबोधी (नागपूर), पुणेचे जिल्हाधिकारी सदानंद कोचे, डॉ.कौशल पवार (नवी दिल्ली) आदी उपस्थित राहतील.
त्याच दिवशी रात्री १० वाजता ‘सद्धम्माची गौरव गाथा’ हा बुद्ध-भीम गितांचा कार्यक्रम हेमंत शेंडे व त्यांचा संच सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)
तयारी अखेरच्या टप्प्यात
चंद्रपूर येथील डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाची तयारी जोरात सुरू आहे. या ठिकाणी मोठा मंडप उभारला जात आहे. दीक्षाभूमीसमोरील रस्त्यावर दुतर्फा पुस्तकांचे स्टॉल लावण्यात येत आहेत. त्याचीही उभारणी अखेरच्या टप्प्यात आहे. वरोरा नाका चौक ते चांदा क्लब ग्राऊंड मार्गावर दोनही बाजुने विविध सामाजिक संघटनांकडून भोजनाचे मोफत स्टॉल उभारले जाणार जात आहेत.
तगडा पोलीस बंदोबस्त
दरवर्षी धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी केवळ चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील बौद्ध बांधव हजारोच्या संख्येने येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणाही या समारंभासाठी सज्ज झाली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, चंद्रपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, चार पोलीस निरीक्षक, ४५ पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४०५ पोलीस शिपाई, १०५ महिला शिपाई, ५० गृहरक्षक दलाचे जवान, ५० वाहतूक शाखेचे शिपाई व समता सैनिक दलाचे २०० स्वयंसेवक बंदोबस्तासाठी तैनात राहतील.
वाहनांच्या रहदारीत बदल
चंद्रपूर : १५ व १६ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील अनुयायी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून चंद्रपूर शहरातील दीक्षाभूमी परिसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता पासून तर १७ आॅक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत बदलविण्यात आला असून जडवाहनास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नागपूरकडून चंद्रपूरकडे येणारी जडवाहने हॉटेल कुंदन प्लाझा पलिकडेच थांबून राहतील तर मूलकडून नागपूरकडे जाणारी जडवाहने एम.ई.एल. नाका येथे थांबतील. बल्लारपूरकडून नागपूरकडे जाणारी वाहने डी.आर.सी. बंकर, बायपास रोड येथे थांबतील. दीक्षाभूमी मार्गावरील जमावाची गर्दी पाहून आवश्यकतेनुसार बंद रहदारीमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी जुना वरोरा नाका ते आंबेडकर महाविद्यालय, मित्रनगर चौक, टी.बी. दवाखान्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग बंद करण्यात येत आहे. तसेच पाण्याची टाकी, विश्रामगृह, जुना वरोरा नाका मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दोन्ही बाजूने बंद करण्यात येत आहे. नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जडवाहने वगळून) हुतात्मा स्मारक चौक जिल्हा स्टेडियम, मित्रनगर मार्गे किंवा जुना वरोरा नाका-उड्डाण पूल, सिद्धार्थ हॉटेल, बसस्थानक, प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील. रामनगर, मित्रनगर, आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणारे नागरिक पाण्याची टाकी, दवाबाजार, मित्रनगर चौक, आकाशवाणीमार्गे जातील. जटपुरा गेटकडून रामनगरमार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणारी वाहने पाण्याची टाकी, प्रिदर्शनी चौक, बसस्थानक, सिद्धार्थ हॉटेल, उड्डाण पूलमार्गे नागपूरकडे जातील.
दीक्षाभूमी येथील गर्दी लक्षात घेता जुना वरोरा नाका, आयटीआय कॉर्नर, पत्रकार भवन, उड्डाण पूल परिसर नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतीही वाहने, हॉकर्स, दुकाने लावण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. दीक्षाभूमी सोहळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी दुचाकी व चारचाकी पार्किंगची व्यवस्था न्यू इंग्लिश हायस्कुल क्रीडांगण, टी.बी. हॉस्पिटल मैदान, आय.टी.आय. कॉलेज व जनता कॉलेजसमोर करण्यात आली आहे.