घोडपेठ येथील जगन्नाथबाबांच्या मंदिरात नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:30+5:302021-04-11T04:27:30+5:30

मागील वर्षी याच मंदिरात चोरीची घटनाही घडली होती. मागील वर्षी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जगन्नाथबाबांच्या मंदिरात चोरी केली होती. मंदिरामध्ये ...

Destruction in the temple of Jagannath Baba at Ghodpeth | घोडपेठ येथील जगन्नाथबाबांच्या मंदिरात नासधूस

घोडपेठ येथील जगन्नाथबाबांच्या मंदिरात नासधूस

मागील वर्षी याच मंदिरात चोरीची घटनाही घडली होती.

मागील वर्षी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जगन्नाथबाबांच्या मंदिरात चोरी केली होती. मंदिरामध्ये असलेली मूर्ती, पादुका, फोटो व इतर साहित्य चोरीला गेले होते. बाहेर असलेला बाणही चोरीला गेला होता. तर दुसऱ्या बाणाची विटंबना करण्यात आली होती. त्यावेळी गावातील काही नागरिकांनी पोलीसपाटील यांना रीतसर तक्रार दिली होती. त्यानंतर भक्तांनी मंदिरातील काही वस्तूंची स्थापना केली होती.

मात्र पुन्हा शुक्रवारच्या रात्री मंदिरातील वस्तूंची नासधूस करण्याचा प्रकार घडला आहे. मंदिरातील बाण वाकवलेल्या स्थितीत दिसत आहे. ही घटना शनिवारी सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आली. तसेच मंदिरातील भिंतींनाही तोडण्याच्या उद्देशाने धोका पोहोचवल्याचे लक्षात येत आहे. सदर मंदिराची जागा ही मंदिराला दान दिलेली आहे. तशी नोंद सातबारा उताऱ्यावर आजही आहे. मात्र तरीही काही समाजकंटकांकडून हे मंदिर नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

घोडपेठ येथील जगन्नाथबाबांचे मंदिर हे गावातील व परिसरातील नागरिकांचे श्रध्दास्थान आहे. सध्या राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे सारी यंत्रणा कोरोनाला रोखण्यात लागली आहे. संचारबंदी व लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे प्रशासन व जनता या प्रकाराबद्दल गाफील आहे.

याच गोष्टीचा गैरफायदा घेत या ठिकाणी असा निंदनीय प्रकार सुरू आहे. त्यामुळे येथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Destruction in the temple of Jagannath Baba at Ghodpeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.