आंदोलनाला न जुमानता ‘ड्रगलँड’ मुंगोलीकडे रवाना
By Admin | Updated: May 7, 2016 01:25 IST2016-05-07T01:25:24+5:302016-05-07T01:25:24+5:30
वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे मुंगोली, साखरा या गावांसोबतच नजिकच्या गावांत विविध समस्या निर्माण झाल्या.

आंदोलनाला न जुमानता ‘ड्रगलँड’ मुंगोलीकडे रवाना
घुग्घुस : वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे मुंगोली, साखरा या गावांसोबतच नजिकच्या गावांत विविध समस्या निर्माण झाल्या. त्या समस्याचे निवारण करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्यावतीने वेकोलि अधिकारी, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. मात्र संबंधितांनी वेळकाढु धोरण स्वीकारले. परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. कोळसा उत्खननासाठी वापरण्यात येणारी ‘ड्रगलँड’ हे यंत्र वर्धा नदी पार करून मुंगोलीकडे आगेकूच करत असल्याचे कळताच, मुंगोली व नजिकच्या गावातील लोकांनी विरोध करीत रस्त्यावर येऊन आंदोलन केले. त्यानंतर वेकोलि अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मुंगोली गावाचे पुनर्वसन, गाव, खाण परिसराला लागून असलेल्या शेतजमिनीचे अधिग्रहण करण्यात यावे, त्याचा योग्य मोबदला मिळावा, यासोबतच गावकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. ग्रामपंचायतीकडून वेकोलि व जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिलीत. पाठपुरावा करण्यात आला. आंदोलने करण्यात आलीत. आंदोलनादरम्यान वेकोलि, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठका झाल्यात. समस्याचे निवारण करण्याचे आश्वासन देण्यात आलेत. प्रत्यक्षात समस्या सुटल्या नाहीत.
वेकोलि वणी क्षेत्राचे कार्यक्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस खुल्या कोळसा खाणीत गेल्या अनेक वर्षांपासून कोळसा उत्खननात महत्वाची भूमिका बजावणारी ‘ड्रगलँड’ नावाची मशिन यवतमाळ जिल्ह्यातील मुंगोली खुल्या कोळसा खाणीत नेण्याचा निर्णय वेकोलिने घेतला. तेव्हापासून गावकऱ्यांकडून याला विरोध केल्या जात असला तरी त्याकडे वेकोलि व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. गेल्या महिन्यात वेकोलि, जिल्हा प्रशासनाला मुंगोलीसह विविध ग्रामपंचायतीच्या सरपंचानी आंदोलनाची भूमिका कळविली होती. १ मेपासून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. मात्र वेकोलि अधिकारी वा प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेत नाही.
दरम्यान, वेकोलिने लोकभावनांकडे दुर्लक्ष करीत चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी पार करून यवतमाळ जिल्हातील मुंगोली खाणीकडे ‘ड्रगलँड’ नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच मुंगोली येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर वेकोलि अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)