२०४७ मध्ये देश विश्वगुरू -भटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:46+5:30
जगाला आवश्यक असणाऱ्या सर्व क्षमतांची उपलब्धता ऐतिहासिक चंद्रपूर जिल्ह्याच्या तरुणाईमध्ये आहे. कोळशाच्या खाणींच्या या शहरात जग बदलण्याची क्षमता असणारे कोहिनूर उपलब्ध आहेत.

२०४७ मध्ये देश विश्वगुरू -भटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कधी काळी हा देश अतिशय संपन्न देश होता. वैदिक काळामध्ये आपल्याकडे जगाचे नेतृत्व होते. मात्र आता पुन्हा एकदा सर्व क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक संसाधनातून २०४७ मध्ये आपल्याला विश्वगुरू करण्यापासून कोणीही अडथळा आणू शकत नाही. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक पुढे येणे गरजेचे असून संशोधन वृत्ती बाळगणे आवश्यक आहे., असे प्रतिपादन पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांनी केले.
स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहामध्ये आयोजित चंद्रपूर जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धेचे उदघाटन पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, सिईओ राहुल कर्डिले, टाटा टेक्नॉलॉजीचे संचालक पुष्कराज कौलगुड, राहुल पाटील, उन्नत भारत अभियानाच्या विदर्भ संयोजक अर्चना बारब्दे आदी उपस्थित होते.
चंद्रपुरात कोहिनूर हिऱ्याची खाण-सुधीर मुनगंटीवार
जगाला आवश्यक असणाऱ्या सर्व क्षमतांची उपलब्धता ऐतिहासिक चंद्रपूर जिल्ह्याच्या तरुणाईमध्ये आहे. कोळशाच्या खाणींच्या या शहरात जग बदलण्याची क्षमता असणारे कोहिनूर उपलब्ध आहेत. याची मला वारंवार खात्री पटली असून कला, क्रीडा, विज्ञान, संशोधन या क्षेत्रातही चंद्रपूर जगाचे नेतृत्व करील, असा आशावाद राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.