कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:10+5:302021-02-05T07:41:10+5:30
स्वच्छता करण्याची मागणी गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ...

कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
स्वच्छता करण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी आहे. काही उपद्रवी नागरिकांमुळे सर्वत्र घाण केली जात आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बंधारा दुरुस्तीसाठी निधी द्यावा
वरोरा : तालुक्यातील अनेक बंधाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने शिवारात अनेक बंधारे बांधले. बंधाऱ्यात सध्या पाणी आहे. मात्र, काही ठिकाणी बोगदे पडल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत
जिवती : तालुक्यात अवैध वाहतूक सुरू आहे. हा तालुका आंध्र प्रदेशाच्या सीमेवर असल्याने वाहनांची वर्दळ असते. वाहनचालक भरधाव वेगाने वाहने दमटत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
अवैध वाहतूक तातडीने बंद करून अपघातावर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कार्यालयीन दिरंगाईमुळे कामे प्रलंबित
सावली : शहरात विविध विभागाची शासकीय कार्यालये आहेत. बरेच कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. शासकीय कामे करण्यासाठी शेकडो नागरिकांना दररोज तालुकास्थळी पायपीट करावी लागते. परंतु, काही कर्मचारी कार्यालयात येण्यास दिरंगाई करतात. त्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. दप्तर दिरंगाईचा प्रकार थांबवावा, अशी मागणी होत आहे.
घाण करणाऱ्यांवर कारवाई करावी
पोंभुर्णा : तालुक्यातील बहुतेक शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. मात्र, अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पाणीपुरवठा योजनेला निधी देण्याची मागणी
मूल : तालुक्यातील काही गावांमध्ये येत्या काही महिन्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. निधीअभावी पाणीपुरवठा योजनेची कामे थंडावली. जि.प. पाणीपुरवठा विभागाकडून पाहणी केली जात आहे. त्यामुळे समस्या निर्माण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतींसाठी निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.
बसफेरी सुरू करण्याची मागणी
कोरपना : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व अतिमागास तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख असली तरी औद्योगिकदृष्ट्या या तालुक्याची प्रगती झाली आहे. त्यामुळे येथील नगरविस्तार व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, कोरपना या तालुकास्तरावरून अनेक गाव व शहरांसाठी थेट बससेवा व नियोजित वेळेत बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील काही रस्ते अगदी चिंचोळे आहेत. त्यातच शहरात मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. महानगरपालिका उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.