जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक
By Admin | Updated: September 4, 2014 23:41 IST2014-09-04T23:41:27+5:302014-09-04T23:41:27+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. सर्दी, खोकला, मलेरियासारख्या रोगांच्या यापूर्वी साथी पसरल्या. मात्र काही दिवसांपासून डेंग्यूनेच उद्रेक सुरू केला आहे.

जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक
सेवा कोलमडली : आरोग्य विभागाच्या दुर्लक्षेमुळे जाताहेत बळी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. सर्दी, खोकला, मलेरियासारख्या रोगांच्या यापूर्वी साथी पसरल्या. मात्र काही दिवसांपासून डेंग्यूनेच उद्रेक सुरू केला आहे. अनेक गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे तर काही जणांचा यात बळीही गेला आहे.
सास्ती- राजुरा तालुक्यातील चार्ली येथे माागील काही दिवसांपासून डेंग्यूसदृश्य तापाच्या साथीने संपूर्ण गावाला जखडले असून एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तापाने रुग्ण दगावाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याठिकाणी वैद्यकीय सेवाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
राजुरा तालुक्यातील नदीपट्टयातील भागात तापाची साथ सुरू आहे. त्यात चार्ली येथे मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असून गावातील प्रत्येक घरात एक रुग्ण आढळून येत आहे. मोठ्या प्रमाणात साथ सुरू असूनही आरोग्य विभाग याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळेच येथील माया दत्तु बोढे (३०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गावात असे अनेक रुग्ण असून त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या महिलेला दोन दिवसांपासून ताप येत होता. राजुरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला. तापामुळे महिलेचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन साथीवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
या परिसरात कढोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही परिसरातील तापाच्या साथीवर आळा बसत नसल्याने येथील कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी (कोके) व चिमूर तालुक्यातील गोंदेडा येथे डेंग्युच्या रुग्णात आणखी वाढ झालेली आहे. पेंढरी कोके येथील गजभिये वॉर्डात बरेच तर गोंदेडा येथील वैष्णवी नामदेवराव घोडाम (१२) हिला डेंग्यूची लागण झाल्यामुळे प्रथम चिमूर येथील डॉ. दिलीप शिवरकर यांच्या हॉस्पिटलमध्ये व नंतर चंद्रपूर येथील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यात भरती केले आहे. परिसरातील बऱ्याच गावात डेंग्यूसदृश्य तापाची साथ सुरू आहे. परंतु या गंभीर बाबीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.
अऱ्हेरनवरगाव येथे डेंग्यूची साथ
स्थानिक पिंपळगाव जि.प. क्षेत्रातील अनेक गावात सध्या मलेरिया डेंग्युसदृश्य तापाची साथ पसरली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ग्रामीण रुग्णालय हाऊसफूल्ल आहेत. अपुऱ्या खाटाअभावी रुग्णांना खालीच उपचार घ्यावा लागत आहे. अऱ्हेरनवरगावातील चार रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुरुषोत्तम पुंडलीक देवढगले (३०) या रुग्णाला नागपूर येथे दाखल केले आहे. गोलू बाबुराव राऊत (१९), विशाखा ज्ञानेश्वर देवढगले व (१४) किर्ती विशाल ठेंगरे (४) या रुग्णांवर ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (लोकमत चमू)