धूर फवारणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST2021-03-28T04:27:10+5:302021-03-28T04:27:10+5:30

रस्त्यावरील अंधार दूर करा कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गावर पथदिवे नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य ...

Demand for smoke spraying | धूर फवारणी करण्याची मागणी

धूर फवारणी करण्याची मागणी

रस्त्यावरील अंधार दूर करा

कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गावर पथदिवे नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर पोलीस स्टेशन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, क्रीडा संकुल आदी आहेत.

कोसा उत्पादकांना लोखंडी शिडी द्यावी

चंद्रपूर : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा (रेशीम) उत्पादनावर भर आहे. सावली, मूल, चिमूर, सिंदेवाही तालुक्यात कोसा उत्पादन घेतल्या जाते. झाडावरुन कोसा तोडण्यासाठी लोखंडी शिडी शासनाने सदर उत्पादकांना द्यावी, अशी मागणी कोसा उत्पादकांनी केली आहे.

कोरपना येथील दूरभाष केंद्र रामभरोसे

कोरपना : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथील दूरभाष केंद्र दुर्लक्षितपणामुळे दुरवस्थेकडे वाटचाल करीत आहे. मात्र, याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आजघडीला टाॅवर, मायक्रोवेव्ह यंत्रणा, दूरभाष केंद्र व सदनिका परिसर संपूर्णतः झुडपाने वेढला गेला आहे. परिणामी, येथे माकड व इतर हिंस्र प्राणी यांचा वावर वाढला आहे. इमारतीवरही मधमाशांचे पोळे तयार झाले आहे. येथील कार्यालय केवळ नाममात्र आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

झाडांना सकाळच्या वेळेस पाणी टाकावे

चंद्रपूर : मागील काही दिवसापासून तापमान वाढत आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना कंत्राटदारामार्फत पाणी टाकले जात आहे. मात्र सदर पाणी सकाळी ११ तसेच दुपारीही टाकले जात आहे. त्यामुळे झाडांना फायदा होण्यापेक्षा नुकसानच होत आहे. त्यामुळे पाणी टाकताना सकाळच्याच वेळी पाणी टाकावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

राजस्व अभियान सुरू ठेवण्याची मागणी

जिवती : तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात राजस्व अभियान राबविण्यात येत होते. या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजामुळे अनेक प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहेत. मात्र कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनावरांना अडचण जात आहे.

काळी-पिवळीवरील प्रवासी विनामास्क

घोसरी : पोंभुर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Demand for smoke spraying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.