पाणी प्रश्न टाळण्यासाठी बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी
By Admin | Updated: August 20, 2014 23:27 IST2014-08-20T23:27:00+5:302014-08-20T23:27:00+5:30
दोन महिन्यापूर्वी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्न भेडसावत असताना याची झळ महाराष्ट्र-तेलंगनाच्या सीमेलगत असलेल्या राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याला सहन करावी लागली.

पाणी प्रश्न टाळण्यासाठी बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी
सास्ती : दोन महिन्यापूर्वी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्न भेडसावत असताना याची झळ महाराष्ट्र-तेलंगनाच्या सीमेलगत असलेल्या राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याला सहन करावी लागली. अनेक गावांमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यातच पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. आताच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागत आहे. भविष्यात जलसंकटाची ही स्थिती भयावह होऊ शकते. जलसंकट टाळण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर गोरे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे. पावसाच्या लांबणीने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरलेले असताना शासनाने याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.
राजुरा, कोरपना तालुक्यात वाढते उद्योगधंदे व प्रकल्पांकरिता पाण्याचा अधिक प्रमाणात उपसा होत असल्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन जिल्ह्यात वर्धा नदीवर बॅरेज बंधारा बांधण्याची गरज आहे. बॅरेज बंधारा बांधण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण भोयगाव-जैतापूर-कुर्ली गावाच्या दरम्यान वन विभागाची ३५० एकर झुडपी जंगलाची जागा वर्धा नदीला लागलेली आहे. ही गावे नदी किनाऱ्यावरुन तीन ते चार किमी अंतरावर आहे. याच बरोबर नदीच्या पलीकडे असलेले चंद्रपूर तालुक्यातील पिपरी धानोरा हे गाव दोन ते तीन किमी अंतर येत असल्याने या ठिकाणी बॅरेज बंधारा बांधल्यास कोणत्याही शेतकऱ्यांना किंवा गाववासीयांना प्रकल्प बाधित व्हावे लागणार नाही. या परिसरातील शेतकऱ्यांबरोबर राजुरा, कोरपना, चंद्रपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेता येतील.
तालुक्यातुन बारमाही वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा नदीतून जिल्ह्यातील मोठ्या शहरांना, एमआयडीसी सह अनेक प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदीवर एकही बॅरेज नसल्यामुळे बारमाही वाहणारे पाणी वाहून जाते. याचा तिळमात्र फायदा येथील शेतकऱ्यांना झालेला नाही. राजुरा कोरपना तालुक्यात सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात असून सिंचनाच्या सोईकरिता वर्धा नदीवर बॅरेज बंधारा बांधने गरजेचे आहे. अन्यथा सर्वांसाठी जीवनदायिनी वर्धा नदी कोरडी पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)