नरेश पुगलियांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By Admin | Updated: September 2, 2014 23:37 IST2014-09-02T23:37:55+5:302014-09-02T23:37:55+5:30
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या झालेल्या पिछाडीला मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. तरीही पक्षाच्या या पराभवाला राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार

नरेश पुगलियांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या झालेल्या पिछाडीला मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. तरीही पक्षाच्या या पराभवाला राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार असल्याचे त्यांनी केलेले विधान स्वत:ची निष्क्रियता आणि निर्णयक्षमता लपविण्यासाठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देऊन त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवाला युपीए-२ सरकारची वाईट प्रतिमा आणि राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलिकडे दिली होती. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुगलिया म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांची एकाधिकारशाही संपविण्यासाठी पक्षाने त्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळे तोल सुटल्याने आपल्या मर्यांदांचे भान विसरून त्यांनी खुद्द पक्ष नेतृत्वावरच असा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षनेतृत्वाबद्दल केलेले नकारात्मक वक्तव्य पक्षाची प्रतिमा मलिन करणारी असून पक्षकार्यकर्त्यांच्या आदराला धक्का पोहचविणारी आहे.
प्रत्यक्षात मुख्यमंत्री या नात्याने ते अकार्यक्षम राहीले आहेत. अलिकडे दिसणारी कार्यक्षमता गेल्या दोन वर्षात दिसली असती तर पक्षाला फायदा झाला असता. मात्र आपल्या निष्क्रियतेचे खापर राहूल गांधींच्या माथी फोडण्याचा हा प्रकार चुकीचा असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्याच्या या अस्वस्थेमागे बरीच कारणे असल्याचे सांगून ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवारांना तिकीटा देण्याऐवजी स्वमर्जीतील व्यक्तींना तिकीटा दिल्याने पराभव पहावा लागला. ही जबाबदारी त्यांची असताना नेतृत्वावर आरोप कितपत योग्य आहे, असा प्रश्नही उपस्थित केला. (जिल्हा प्रतिनिधी)