आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

By Admin | Updated: March 11, 2015 01:10 IST2015-03-11T01:10:14+5:302015-03-11T01:10:14+5:30

सावली तालुक्यात आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.

Dehyargation of health service | आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

गेवरा: सावली तालुक्यात आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.
तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रावर तालुकास्तरावरुन नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे पद असते. परंतु सावली तालुक्यातील मागील वर्षीपासून हे पद रिक्त आहे. अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ेप्रशिक्षणासाठी गेले असल्याने जुलै- आॅगस्टपासून ते पदसुद्धा रिक्त आहे. या आरोग्य केंद्राअंतर्गत विहिरगाव, निमगाव, गेवरा, निफंद्रा, बेलगाव, अंतरगाव असे सहा उपकेंद्र येतात. यामध्ये विहिरगाव येथे अ‍ॅलोपॅथीक उपकेंद्र असून त्याठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी आहे. त्यांच्या दिमतीला एक परिचर, एक आरोग्य सेविका, एक एमपीडब्ल्यू वर्कर, एनआरएचएम आरोग्यसेविका ही पदे रिक्त आहेत. या उपकेंद्राक्षेत्रात तीन गावे असून बोरमाळा कसरगाव, विहीरगाव येथील तीन हजार ६७५ नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रावर आहे. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी उरकुडे यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुक्याची व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतरगावचीही जबाबदारी देवून विहिरगाव आरोग्य उपकेंद्रा वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना परिचराकडूनच उपचार करून घ्यावे लागतात.
यापूर्वी ‘लोकमत’ने ‘परिचर चालवितो उपकेंद्र’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल न घेता परिसरातील रुग्णांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. प्रत्यक्ष सदर उपकेंद्राला भेट दिली असता, या ठिकाणी लहान मुलांना उपचारासाठी घेवून आलेल्या मातांना उपचाराविणा परत जावे लागले. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोगुलवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची जाणिव करुन दिली. परंततु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याची बाब सांगितली. रिक्त पदे भरणे ही शासनाची जबाबदारी असून जोपर्यंत डॉक्टरांच्या नवीन नियुक्त्या होणार नाहीत, तोपर्यंत डॉक्टरांची उपलब्धता करता येवू शकत नाही, असे सांगून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न केला.
उपकेंद्रात उपचाराकरिता आलेल्या आजारी बालकांवर उपचार करण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी डॉक्टर उरकुडे यांना विहिरगावला पाठविण्यात आले. शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येक उपकेंद्रात २७ प्रकारची औषधे असावी लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रात ६७ प्रकारची औषधे असावी लागते. परंतु शासकीयस्तरावर मोजक्याच औषधांची याठिकाणी उपलब्ध असते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना खासगी वैद्यकीय सेवांकडे वळावे लागते. (वार्ताहर)

Web Title: Dehyargation of health service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.