नागभीड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:05+5:302021-01-02T04:24:05+5:30
नागभीड : नागभीड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. जून ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत ८७८ व्यक्तींना ...

नागभीड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
नागभीड : नागभीड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. जून ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत ८७८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असली तरी डिसेंबर महिन्यात ४८ रुग्णांचीच नोंद झाली आहे.
शासनाने २३ मार्च २०२० रोजी जेव्हा पहिल्यांदा लाॅकडाऊन सुरू केले, तेव्हा ‘आम्हीच आमचे रक्षक’ म्हणून तालुक्यात अनेक गावांनी गावच्या सीमेवर कुंपण घालून बाहेरील लोकांना प्रवेशबंदी केली होती. तालुक्यातील जनकापूर या गावाने या प्रवेशबंदीची सुरुवात केली आणि त्याचे लोन अनेक गावात पोहोचले होते. ही प्रवेशबंदी मोडून काढण्यासाठी प्रशासनास चांगलाच आटापिटा करावा लागला होता.
शहरात व नागभीड तालुक्यात पहिल्यांदा ३ जून रोजी कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यावेळी शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. नगर परिषद प्रशासनाने लागलीच तो परिसर सील करून प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली. त्या परिसरात अवागमनावर निर्बंध घालण्यात आले. त्या बाधिताच्या संपर्कात आलेल्या नोंदी घेण्यात आल्या. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. नंतर काही दिवसांनंतर एक दाम्पत्य पाॅझिटिव्ह आले. पुन्हा हीच प्रक्रिया राबविण्यात आली. पाॅझिटिव्ह आलेल्यांच्या कोण कोण संपर्कात आले आहेत त्यांची टेस्ट केली का ?, त्यांचा रिपोर्ट काय आला ? संपर्कातील व्यक्तीही पाॅझिटिव्ह आले का, याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असायची. त्यावेळी रिपोर्ट हा चंद्रपूर किंवा नागपूर येथून येत होता; पण सद्य:स्थितीत हा इतिहास झाला आहे. आता लगेच रिपोर्ट मिळायला लागले आहेत. प्रशासनाकडून पूर्वी ज्या उपाययोजना केल्या जायच्या, त्या उपाययोजना आता त्या त्वरेने होताना दिसत नाही. ज्या भागात रुग्ण आढळला, तो भाग सील करणेही बंद केल्याचे दिसून येत आहे. गावकरी सुरूवातीला जी सतर्कता बाळगायचे, ती सतर्कताही आता दिसून येत नाही.
माहितीनुसार नागभीड तालुक्यात जून महिन्यात चार रुग्ण, जुलै महिन्यात २१, ऑगस्टमध्ये ९२, सप्टेंबर २३२,ऑक्टोबर ३४९, नोव्हेंबर महिन्यात १३२ आणि डिसेंबरमध्ये ४८ रुग्ण आढळून आले आहेत. एकंदर आकडेवारी लक्षात घेतली तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत नागभीड तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे.