सावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
By Admin | Updated: March 9, 2016 02:00 IST2016-03-09T02:00:32+5:302016-03-09T02:00:32+5:30
पंचायत समिती सावली येथे ब्रह्मपुरी-सावली विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आमसभा पार पजली.

सावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
ठराव पारित : विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची आमसभा
सावली : पंचायत समिती सावली येथे ब्रह्मपुरी-सावली विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आमसभा पार पजली. आमसभेला विविध विभागाचे अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
सदर आमसभेत संपूर्ण सावली तालुक्याची आणेवारी पन्नास टक्क्याच्या कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. म्हणून शासनाने संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा असा ठराव यावेळी पारित करण्यात आला. याप्रसंगी मंचावर जि.प. सदस्य दिनेश चिटनुवार, वैशाली कुकडे, सावली पंचायत समितीच्या सभापती चंदा लेनगुरे, उपसभापती मंगला चिमड्यालवार, सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, पं.स. सदस्य अनिता चुनारकर, धर्माजी सिडाम, अविनाश पाल, राकेश गड्डमवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश सिद्धम, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आशिष मनबत्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी शशिकांत शिंदे, तहसीलदार वंदना सौरंगपते आदी मान्यवर उपस्थित होते.
या वर्षाची दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता मामा तलावाच्या दुरुस्तीसाठी शासनाने १०० कोटी रुपये दिले आहेत. मात्र सावली तालुक्यातील ७३ मामा तलावापैकी केवळ ७ तालावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर झाला, ही क्लेबदायक बाब आहे. त्यामुळे सर्व तलावांची दुरुस्ती मे महिन्यापर्यंत झाली पाहिजे, असा गर्भित इशारा आ. वडेट्टीवार यांनी संबंधितांना दिला. पाणी पुरवठा योजनेचे काम ज्या गावात सुरू आहे. ते त्वरीत पूर्ण करावे, योजनेचे काम ज्या गावात सुरू आहे. ते त्वरीत पूर्ण करावे व सर्व ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, तसेच म.ग्रा. रोहयो योजनेंतर्गत ज्या गावात भ्रष्टाचार झाला आहे. त्या- त्या गावात कामाची योग्य चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी काही ग्रामस्थांनी लावून धरली. शिवाय कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सुतोवाच आ.वडेट्टीवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीडीओ शशिकांत शिंदे यांनी, संचालन कृषी अधिकारी घनश्याम पसारे व विस्तार अधिकारी दक्षक मून यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी खांडरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)