चंद्रपूर जिल्ह्यात कोठारी वनक्षेत्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 14:21 IST2020-03-13T14:18:34+5:302020-03-13T14:21:36+5:30
शुक्रवारी सकाळी कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बामणी येथील एका शेतात एक पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सदर वाघाचा मृत्यू झाला.

चंद्रपूर जिल्ह्यात कोठारी वनक्षेत्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बामणी येथील एका शेतात एक पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार समोर आला. याची माहिती वनविभागाला देण्यात आले. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सदर वाघाचा मृत्यू झाला. सदर वाघ एक वर्ष वयाचा असून रानडुकरासोबतच्या झुंजीत तो गंभीर झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
कोठारी वन परिक्षेत्रातील बामणी गावातील पुंडलिक मडावी हे शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात भाजीपाला पिकाची पाहणी करण्याकरिता गेले होते. अचानक त्यांना वांग्यांच्या झाडामध्ये पट्टेदार वाघ झोपून असल्याचे दिसले. यामुळे पुंडलिक मडावी हे घाबरून गेले. लगेच त्यांनी गावाकडे धूम ठोकत गावकऱ्यांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी तत्काळ मडावी यांच्या शेतात येऊन पाहणी केली असता सदर वाघ जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले. गावकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे याची माहिती वनरक्षक टेकाम यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाघावर जाळी टाकून त्याला संरक्षण दिले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. मुख्य वनसंरक्षक रामाराव, मध्यचांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत जखमी वाघाचा मृत्यू झाला होता. सदर वाघ एक वर्ष वयाचा असून रानडुकराच्या झुंजीत तो जखमी झाला असावा, असा अंदाज आहे. वाघाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यू नेमके कारण कळू शकेल.