वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. अनेकदा आंदोलने झाली. प्रदूषण नियंत्रित करण्याचे आश्वासन मिळाले. मात्र प्रदूषण कमी झाले नाही. उलट प्रदूषण वाढले. विविध आजाराचे प्रमाण वाढले. घुग्घुस गावाच्या लोक वसाहतीला लागून पूर्व दिशेला लायड मेटल अँड एनर्जीचा कच्च्या लोखंडाचा कारखाना आहे. नियमानुसार प्रदूषण होऊ नये म्हणून आवश्यक त्या संयंत्राचा वापर होत नसल्याने प्रदूषणात अधिक वाढ होत आहे. त्याचा परिणाम नवजात मुले विविध आजार घेऊन जन्माला येत आहे. दमा, चर्मरोग, हृदयरोग अशा अन्य गंभीर आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. येथीलच नव्हे तर जिल्ह्यातील नेत्यांनी याबाबत कारखानदार, जिल्ह्यातील प्रदूषण मंडळ व राज्यातील प्रदूषण मंडळाचे लक्ष वेधले. मात्र प्रदूषण नियंत्रणात आले नाही. रात्री कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूळ सोडली जाते. त्याचे प्रमाण इतके असते की जवळचे दिवेसुद्धा दिसत नाहीत. सकाळी सुदृढ आरोग्य राहावे म्हणून महिला-पुरुष मार्निंग वाॅकला जातात. मात्र प्रदूषणामुळे मार्निंग वाॅकचा फायदा होत नसून नाकाला कापड बांधावे लागत आहे. कोळसा वाहतुकीदरम्यानही मोठ्या प्रमाणात धूळ उडते. नजीकच्या कामगार वसाहतीमधील लोकांना प्रदूषणाचा फटका बसत आहे. गेल्या आठवड्यात अचानक कामगार वसाहतीमधील महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी वेकोलि व्यवस्थापनाने आश्वासन दिले. मात्र आश्वासनाची पूर्ती झाली नाही.
घुग्घुस परिसरात जीवघेणे प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST