भटक्यांच्या चिमुकल्यांसाठी उजळली शिक्षणाची पहाट
By Admin | Updated: November 22, 2015 00:43 IST2015-11-22T00:43:15+5:302015-11-22T00:43:15+5:30
पिढ्यान्पिढ्या भटकंती करीत असल्याने एकाही पिढीने शिक्षण घेतले नाही. सध्याच्या पिढीचेही भटकंतीमुळे शिक्षणाचे दोर कायमचे बंद झाले.

भटक्यांच्या चिमुकल्यांसाठी उजळली शिक्षणाची पहाट
वरोरा शिक्षण विभागाचा उपक्रम :
४० पटसंख्या असलेली पालावरची शाळा सुरू
प्रवीण खिरटकर वरोरा
पिढ्यान्पिढ्या भटकंती करीत असल्याने एकाही पिढीने शिक्षण घेतले नाही. सध्याच्या पिढीचेही भटकंतीमुळे शिक्षणाचे दोर कायमचे बंद झाले. परंतु वरोरा शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन त्यांच्या झोपड्यामध्ये ४० विद्यार्थी असलेली पालावरची शाळा उघडून शिक्षणाचे दारे मोकळे केले आहे. ४० पटसंख्या असलेली पालावरची शाळा ही पहिलीच शाळा असल्याचे मानले जात आहे.
शासनाने एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये याकरीता मागील काही वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. यात अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे सुरू आहे. वरोरा शहरानजीकच्या नागपूर-चंद्रपूर मार्गालगत मोकळ्या जागेवर जवळपास तीन झोपड्या उभारुन काही भटकंती करणारे कुटुंब राहत आहेत.
पुरुष जडीबुट्टी विकण्याकरीता सकाळीच घराबाहेर निघून जात. त्यानंतर महिला व मुलं- मुली झोपड्यावरच राहत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मुले येथे वास्तव्यास असल्याची बाब जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते व वरोरा येथील गटशिक्षणाधिकारी आर.आर. चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्या झोपड्यावर जावून त्यांची चौकशी करीत मुलांचे नावे नोंदवून घेतले. दिवाळीत घरोघरी जावून फराळ गोळा करुन त्यांच्या झोपड्यावर देवून मुलांना व त्यांच्या पालकांना विश्वासात घेतले.
त्यानंतर त्यांना शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला. याला त्यांंनी होकार देताच शाळेच्या दिवाळीच्या सुट्टया संपण्यापूर्वीच ही पालावरची शाळा वरोरा शिक्षण विभागाने अभिनव पद्धतीने सुरू केली आहे.
त्यांच्याच एका झोपडीमध्ये सकाळी ११ वाजता मुलांना गोळा करुन बसविले जाते आणि शिक्षणाचे एक एक कित्ते गिरविणे सुरू होते. पालावरची शाळा सुरू होवून दोनच दिवस झाले. या शाळेला भेट देणाऱ्या व्यक्तीस विद्यार्थी उभे राहून दोन्ही हात जोडून ‘नमस्ते सरजी’ घोषणा देत असल्याने या शाळेबाबत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
जितके दिवस या झोपड्या वरोरा येथे आहेत, तोपर्यंत या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम विषयतज्ञ्ज गरीबदास जीवने, संतोष कोमरेड्डीवार, चंद्रकांत पेटकर, प्रतिभा हरणे करणार आहेत.