पुराच्या धोक्याने नागरिक धास्तावले
By Admin | Updated: July 24, 2014 23:48 IST2014-07-24T23:48:17+5:302014-07-24T23:48:17+5:30
विलंबाने पडलेल्या पावसाने आता आपला रंग दाखविणे सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून ब्रह्मपुरीत पाऊस सुरूच आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील

पुराच्या धोक्याने नागरिक धास्तावले
ब्रह्मपुरी : विलंबाने पडलेल्या पावसाने आता आपला रंग दाखविणे सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून ब्रह्मपुरीत पाऊस सुरूच आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील काही गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. गोसेखुर्दचे ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात बुधवारी (दि. २३) सरासरी ३२३ मिमी. पावसाची नोंद झाली. सर्वात जास्त पाऊस ब्रह्मपुरी येथेच पडला. येथे ११५.४ मिमी.ची नोंद झाली.
गेल्या शनिवारपासून जिल्ह्यात कमी-जास्त पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात ब्रह्मपुरी, मूल, सावली तालुक्यातील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. वैनगंगा नदीच्या तीरावर ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी, भालेश्वर, लाडज, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव, बोडेगाव, रणमोचन, आवळगावआइण बरडकिन्ही ही गावे आहेत. याच गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. पुराचा धोका लक्षात घेता तलाठी, कोतवालांना गावातच उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांचे मार्ग बंद झाले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, चौगान, रस्त्यावरील वाहणाऱ्या नाल्यांवरून पाणी वाहत आहे. यामुळे या भागातील मार्ग बंद झाले आहेत. वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने काठावरील गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)