सोशल मीडियावर सायबर सेलची नजर
By Admin | Updated: September 16, 2014 23:37 IST2014-09-16T23:37:24+5:302014-09-16T23:37:24+5:30
विधानसभा निवडणुकी दरम्यान सोशल मीडियाच्या होणाऱ्या वापरावर पोलीस विभागाच्या सायबर सेलची नजर राहणार आहे. नागरिकांनी व मतदारांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करावा,

सोशल मीडियावर सायबर सेलची नजर
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकी दरम्यान सोशल मीडियाच्या होणाऱ्या वापरावर पोलीस विभागाच्या सायबर सेलची नजर राहणार आहे. नागरिकांनी व मतदारांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
प्रशासन व पोलीस विभागाने निवडणुकीच्या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस विभागाच्या सभागृहात आयोजित संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे व सर्व निवडणूक अधिकारी तथा पोलीस अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निर्देशनास आल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अनावश्यक रोख रक्कम घेवून जाण्याचे नागरिकांनी टाळावे असे सांगताच सबळ पुरावे नसल्यास रक्कम जप्त करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देण्यासाठी भेट वस्तु अथवा दारू यासारख्या बाबी निर्देशनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणीचे ठिकाण तात्काळ निश्चित करावे त्याचप्रमाणे या ठिकाणी लागणारी सुरक्षा याबाबत ताबडतोब निर्णय घेवून तसे कळवावे. प्रचार साहित्य छापणाऱ्या प्रिटिंग प्रेसला निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे साहित्य छपाई करण्याच्या सूचना देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात यावी. मिरवणुकीचे मार्ग व सभास्थळ याबाबतची परवानगी देताना दोन उमेदवारांचा एकच मार्ग अथवा एकच स्थळ आणि वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी. स्टार प्रचारक यांच्यासाठी लागणाऱ्या हेलीकॉप्टरची परवानगी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यास्तरावर देण्यात येईल. जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणाले की, आचारसंहितेचे उल्लंघन, दारू व रोख रक्कम आदी बाबतचे गुन्हे पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ नोंदवून त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवावी. निवडणूक असल्यामुळे या कामात हयगय करू नये असे निर्देश त्यांनी दिले. रोख रक्कम वहानासंबंधी सबळ पुरावे असल्यास सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिल्या. (नगर प्रतिनिधी)