ग्रामीण भागाला सिंगल फेजिंग योजनेचा शाप
By Admin | Updated: November 8, 2014 22:34 IST2014-11-08T22:34:19+5:302014-11-08T22:34:19+5:30
तालुक्यातील ग्रामीण भाग लोडशेडिंग मुक्त केल्याचा मोठा गाजावाजा करीत सात वर्षांपूर्वी सिंगल फेजींग योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविण्यात आली. सिंगल फेजींगमध्ये गावात उजेड मिळाला.

ग्रामीण भागाला सिंगल फेजिंग योजनेचा शाप
थ्री फेजचा अत्यल्प पुरवठा :
वरोरा : तालुक्यातील ग्रामीण भाग लोडशेडिंग मुक्त केल्याचा मोठा गाजावाजा करीत सात वर्षांपूर्वी सिंगल फेजींग योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविण्यात आली. सिंगल फेजींगमध्ये गावात उजेड मिळाला. परंतु थ्री फेजचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने शेताला सिंचनाकरिता पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. ग्रामीण भागातील उद्योगांना थ्री फेज पुरवठा होत नसल्याने उद्योगही बुडाले आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यात सिंगल फेज योजना शेतकरी व उद्योगांकरिता शाप ठरली आहे.
ग्रामीण व शहरी भाग लोडशेंडींगमुक्त करण्याकरिता वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या सहकार्याने अक्षय प्रकाश योजना राबविली. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात सिंगल फेज योजना राबविणे सुरू केले. लोडशेडींगच्या वेळी घरातील वीज पुरवठा सुरू राहतो. ही योजना वरोरा तालुक्यात यशस्वीपणे राबविल्याने वरोरा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात सर्वत्र गेले होते. आता या योजनेची डोकेदुखी दिवसागणिक वाढत आहे.
बुधवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवसात सकाळी १०.४५ ते दुपारी ४.४५ वाजेपर्यंत थ्री फेजचा पुरवठा राहतो तर मंगळवार,शुक्रवार व रविवार थ्री फेजचा पुरवठा दुपारी ३.४५ ते रात्री ९.४५ पर्यंत राहतो. त्यामुळे आठवड्यातील चार दिवस शेती व उद्योगांना थ्री फेजचा पुरवठा दिवसा सहा तास मिळतो तर उर्वरित दिवसात रात्री सहा तास मिळतो. परंतु या दिवसात रात्री ९.४५ पर्यंत थ्री फेजचा पुरवठा होत असल्याने रात्री शेती व उद्योगांना त्याचा उपयोग कसा करावा, हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. २४ तासात ग्रामीण भागात फक्त सहा तास थ्री फेजचा पुरवठा सुरू असतो. त्यामुळे लाखो रुपये गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना चांगलाच फटका बसत आहे. अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा वावर शेतात असल्याने रात्री पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही. त्यामुळे कर्ज काढून शेतात ट्यूबवेल व विहिरी खोदल्या. त्यावर वीज पंप बसवून सिंचनाची व्यवस्था करता येत नसल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा डोंगर दिवसागणिक वाढत आहे.
शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. थ्री फेज सुरू असताना कधी मेंटेनन्स, ब्रेकडाऊन, शटडावून असा व्यत्ययही अनेकदा येत असते. त्यामुळे ग्रामीण भागात दिवसा थ्री फेजचा पुरवठा सातही दिवस ठेवून सध्याच्या थ्री फेजच्या तारामध्ये वाढ करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीमध्ये आणखी वाढ झाल्यास त्यात आश्चर्य वाटू नये. परिणामी या सिंगल फेजिंग योजनेमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामीण भागात जोर धरीत आहे. (तालुका प्रतिनिधी)