हा तर अमानुषतेचा कळस

By Admin | Updated: September 5, 2015 00:55 IST2015-09-05T00:55:01+5:302015-09-05T00:55:01+5:30

एका निरपराधाला इतक्या निर्दयपणे मारहाण करणे हा अमानुषतेचा कळसच आहे, अशा शब्दात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

This is the culmination of inhumanity | हा तर अमानुषतेचा कळस

हा तर अमानुषतेचा कळस

पालकमंत्री व्यथित : सुधीर मुनगंटीवारांनी घेतली बोथरा कुटुंबाची भेट
चंद्रपूर : एका निरपराधाला इतक्या निर्दयपणे मारहाण करणे हा अमानुषतेचा कळसच आहे, अशा शब्दात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शुक्रवारी दुपारी राज्याचे वन तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोेलिसांच्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रोहीत बोथरा याच्या घरी भेट दिली. रोहीतच्या कुटुंबियाने ना.मुनगंटीवार यांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. घटनेचा वृत्तांत ऐकून ना.मुनगंटीवारही व्यथित झाले. एखाद्या निरपराध युवकाला कोणतीही विचारपूस वा चौकशी न करता अशा पद्धतीने मारहाण करणे ही बाब अतिशय गंभीर असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.
याप्रसंगी रोहीतच्या कुटुंबीयाने घटनाक्रम सांगताना, पोलिसांच्या दंडेलीचे अनेक किस्से पालकमंत्र्यांना ऐकविले. रोहीतला मारहाण करतानाच रोहीतने चिमूरच्या ज्या व्यापाऱ्याकडून वसुलीची रक्कम आणली, त्याला फोन करून रोहीतने कोणती दारू आपल्याला आणून दिली, असा प्रश्न वारंवार विचारला. मात्र संबंधित व्यापाऱ्याने दारूचा आणि रोहीतचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र तरीही रोहीतला बेदम मारहाण केली जात होती. परंतु ही मारहाण अंगावर शेकण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. मात्र शहरातील काही प्रतिष्ठांनी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणात हस्तक्षेप केला. वस्तुस्थिती मांडली. त्यामुळे पोलीस त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू शकले नाहीत, अशी माहितीही बोथरा कुुटुुंबियांनी पालकमंत्र्यांना दिली. या प्रकरणी मी स्वत: पोलीस अधिक्षकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बोथरा कुटुंबियाच्या भेटीनंतर ना.मुनगंटीवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रोहीतची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. यावेळी नगरसेवक रितेश तिवारी यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वडील आणि भावाला धक्काबुक्की
पोलिसांनी रोहीतला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर रोहीतचे वडील रमेश बोथरा व भाऊ आकाश तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी वडील आणि भावालादेखील पोलिसांनी धक्काबुक्की करून तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे.
त्या अधिकारी कर्मचाऱ्याला बडतर्फ करा
रोहीत बोथरा याला कोणताही अपराध नसताना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी यावेळी बोथरा कुटुंबियाने केली.
मारहाण प्रकरणाचे गडचिरोलीत पडसाद
रोहित बोथरा प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी गडचिरोलीतही उमटले. अशा घटना वारंवार होऊ नये याकरिता संघटीत राहून या घटनेचा निषेध करण्यात आला. अशा आशयाचा ठराव दि गडचिरोली मर्चटस् असोसिएशनच्या एका बैठकीत शुक्रवारी पारित करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, उपाध्यक्ष गुरूदेव हरडे, सहसचिव फरिद नाथानी, कोषाध्यक्ष मनोज ठाकूर आदी उपस्थित होते.
हंसराज अहीर यांनीही घेतली भेट
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही शुक्रवारी दुपारी बोथरा कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. घडलेली घटना अमानुष असून या प्रकरणी आपण जिल्हा पोलीस अधिक्षकांशी चर्चा करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या असल्याचे ना.अहीर यांनी बोथरा कुटुंबीयाला सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार नाना शामकुळे व भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: This is the culmination of inhumanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.