कोरोना काळात लग्नकार्यात पाहुण्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:24+5:302021-04-11T04:27:24+5:30
: शासकीय आदेशाची पायमल्ली ब्रह्मपुरी : देशात व ब्रह्मपुरी शहरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, शासनाने यावर ...

कोरोना काळात लग्नकार्यात पाहुण्यांची गर्दी
: शासकीय आदेशाची पायमल्ली
ब्रह्मपुरी : देशात व ब्रह्मपुरी शहरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, शासनाने यावर उपाययोजना म्हणून कडक निर्बंध लागू केले. ग्रामीण भागात लग्न समारंभात फक्त ५० लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी दिली जात आहे. पण, ग्रामीण भागात लग्न समारंभ धूमधडाक्यात सुरू असून अंगणात पाचशे-हजार पाहुण्यांचे मंडप घालून शेकडो पाहुण्यांची उपस्थिती दिसत आहे.
याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा दुसरा टप्पा सुरू असून शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन व्यापार - मार्केट व खासगी कार्यालये बंद केली असून तब्बल आठ दिवस कडक निर्बंध लागू केले तरी ब्रह्मपुरी तालुक्यात व जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक कायम आहे. याचे कारण ग्रामीण भागात सुरू असलेले लग्न समारंभ. यासाठी प्रशासनाने ग्रामीण भागात लग्नकार्यांमध्ये होणाऱ्या गर्दीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बॉक्स
दररोज ३०-४० रुग्णांची भर
ब्रह्मपुरी तालुक्यात दररोज ३०-४० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाकडून ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण, ग्रामीण भागात लग्न समारंभात ५० लोकांची उपस्थिती मर्यादित केली असली तरी लग्न समारंभात शेकडो पाहुण्यांची उपस्थिती बघायला मिळते. अशा लग्न समारंभांवर प्रशासनाने आळा घातला नाही, तर नक्कीच कोरोना रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक होताना दिसून येईल.